थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत करण्याची झाडशहापूर-मच्छे शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : झाडशहापूर व मच्छे परिसरात सुरळीत थ्री फेज विद्युतपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भाजीपाला तसेच इतर पिकांना वेळेत पाणी मिळत नसल्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हेस्कॉमने सलग सात तास सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी झाडशहापूर व मच्छे गावातील शेतकऱ्यांनी बुधवारी हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. एफ-3 फिडरवरील सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतीला वेळेत पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. हेस्कॉमकडून सात तास वीजपुरवठा देण्यात येत असला तरी तो अनियमित असल्यामुळे याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे पहाटे 6 ते दुपारी 1 या वेळेत सलग तास तास थ्री फेज विद्युतपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पिरनवाडी सेक्शनमधील हेस्कॉम अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून आपण मुख्य कार्यालयाला निवेदनाची प्रत पाठवून देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी परशराम गोरल, भरमा नंदिहळ्ळी, कल्लाप्पा गोरल, बसवंत चिठ्ठी, निंगाप्पा नंदिहळ्ळी, परशराम नंदिहळ्ळी, विकास नंदिहळ्ळी, लक्ष्मण मयेकर यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.