युवा संघर्ष यात्रा पोलीसांनी अडवली! विधानभवनाकडे जाताना पोलीसांची कारवाई; रोहीत पवारांचा रस्त्यावरच ठिय्या
महाराष्ट्रभर सुरु असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहीत पवार यांची युवा संघर्ष यात्रा नागपूरामध्ये विधानभवनावर पोहोचण्याआधीच पोलीसांकडून आडवण्यात आली. त्यामुळे नागपूरात विधानभवनाच्या मार्गावर आमदार रोहीत पवारांसह राष्ट्रवादीच्या युवा संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरच ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र भर सुरु असलेल्या आमदार रोहीत पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप आज नागपूरमध्ये झाला. ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभा झाली. या सभेत संजय राऊत, शरद पवार यांची भाषणेही झाली. सभेनंतर हि यात्रा विधानभवनाकडे निघाली होती. मात्र पोलिसांनी ही यात्रा वाटेतच अडवली. या वाटेवर पोलीसांनी बॅरिकेट्स लाऊन मोठा पोलीस फाटा तैनात केला होता. यात्रा जवळ येताच पोलिसांनी अडवून अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर रोहीत पवारांनी आक्रमक होत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरु केलं. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.