युकी भांब्रीचा टेनिस मानांकनात विक्रम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एटीपीच्या पुरूष दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या युकी भांब्रीने नवा इतिहास घडविताना पहिल्या 20 टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. यापूर्वी असा विक्रम भारताच्या रोहन बोपन्नाने केला होता. त्यानंतर असा पराक्रम करणारा युकी भांब्री हा दुसरा भारतीय टेनिसपटू आहे.
भारताच्या युकी भांब्रीने यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या एटीपी दुहेरीच्या मानांकन यादीत 22 व्या स्थानावर होता. आता मात्र त्याने पहिल्या 20 टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. एटीपी टूरवरील झालेल्या विविध स्पर्धांमध्ये तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धेत स्विडनच्या गोरान्सेनसमवेत भांब्रीची कामगिरी समाधानकारक झाली. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत युकीने स्विडनच्या गोरान्सेनसमवेत तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. गेल्या वर्षीच्या टेनिस हंगामात 33 वर्षीय युकी भांब्रीने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत न्यूझीलंडच्या मिचेल व्हिनससमवेत उपांत्य फेरी गाठली होती. भांब्रीने दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत एटीपी 500 दर्जाच्या टूरवरील स्पर्धा पहिल्यांदाज जिंकली होती. या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या पॉपरिनसमवेत आपला सहभाग दर्शविला होता.