For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायएस शर्मिला यांचा लवकरच काँग्रेसप्रवेश

06:49 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
वायएस शर्मिला यांचा लवकरच काँग्रेसप्रवेश
Advertisement

काँग्रेसला आंध्रमध्ये पुनरुज्जीवन देण्याची योजना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तेलंगणात मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आता आंध्रप्रदेशातील गमावलेले राजकीय वर्चस्व पुन्हा मिळवू पाहत आहे. या योजनेच्या अंतर्गत वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष  वाय.एस. शर्मिला या चालू आठवड्यात काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. शर्मिला या वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी  यांच्या भगिनी आहेत.

Advertisement

काँग्रेस नेतृत्व शर्मिला यांना लोकसभा निवडणुकीसोबत आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका देणार आहे. काँग्रेस पक्षात शर्मिला यांना महासचिव पद मिळण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक होणार आहे, अशा स्थितीत बहिणीच्या या निर्णयामुळे जगनमोहन यांना मोठा झटका बसू शकतो. तेलंगणा निवडणुकीतील मोठ्या यशाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

आंध्रप्रदेशात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे. वायएसआरसीपी सोडू पाहणारे अनेक नेते आता काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष तेलगू देसम पक्ष स्वत:चे अस्तित्व कायम राखण्यासाठी झगडत असताना काँग्रेसला आता स्वत:चा प्रभाव वाढविण्याची संधी दिसून येत आहे.

तेलंगणा निर्मिती आंदोलन सुरू असताना जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेससोबतचे नाते तोडून वायएसआरसीपी स्थापन केला होता. त्यांच्यासोबत 18 आमदार आणि काँग्रेसचा एक खासदार नव्या पक्षात सामील होता. भ्रष्टाचाराच्या आरोपात जगनमोहन यांना अटक झाल्यावर त्यांच्या आई वाय.एस. विजयम्मा आणि बहिण वाय.एस. शर्मिला यांनी पक्षाला दिशा दिली होती.

Advertisement
Tags :

.