For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोटबागी येथील वृद्धाला लुटणाऱ्या युट्यूबर्सना अटक

07:04 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोटबागी येथील वृद्धाला लुटणाऱ्या युट्यूबर्सना अटक
Advertisement

अडकविण्याची धमकी देऊन उकळली होती रक्कम

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

गांजा विक्री प्रकरणात अडकविण्याची धमकी देत कोटबागी (ता. हुक्केरी) येथील एका हॉटेल व्यावसायिकाला लुटल्याच्या आरोपावरून हुक्केरी पोलिसांनी चौघा युट्यूबर्सना अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

कल्लाप्पा बसवाणी माळाज (रा. हुक्केरी), मल्लिकार्जुन सिद्धाप्पा जुल्फी (रा. नागरमुन्नोळी, ता. चिकोडी), पृथ्वीराज नारायण चव्हाण (मूळचा रा. माणगाव, ता. चंदगड, सध्या रा. न्यू वंटमुरी), डेव्हीड जाकोब तंगेरहाळ (रा. गणेशपूर बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून एमएच 10 बीके 9595 क्रमांकाची एर्टिगा कार, केए 23 ईझेड 9121 क्रमांकाची मोटारसायकल, दोन मोबाईल संच व 34 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

18 जुलै रोजी सायंकाळी कोटबागी (ता. हुक्केरी) येथील मेहबूब बापूसाब जमादार (वय 59) या हॉटेल व्यावसायिकाला गांजाच्या दोन पुड्या देऊन काकती येथील एका तरुणाने त्याच्याजवळून एक हजार रुपये घेतले होते. गांजा देणारा तरुण तेथून निघून गेल्यानंतर कारमधून आलेल्या चौघा जणांनी मेहबूब यांना कोटबागीजवळ असलेल्या उसाच्या मळ्यात नेऊन आपण पोलीस आहोत, असे सांगून त्यांनी व्हिडिओ रिकॉर्डिंग केले होते.

मेहबूब यांचा व्हिडिओ-फोटो व्हायरल

उसाच्या मळ्यात व्हिडिओ व फोटो घेतल्यानंतर कारगाडीत कोंबून या वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला हुक्केरी पोलीस स्टेशनपर्यंत आणण्यात आले. तुला हिंडलगा जेलला पाठवतो, जेलला जायचे नसेल तर 3 लाख रुपये दे, अशी मागणी केली होती. शेवटी 60 हजार रुपये घेऊन मेहबूब यांची सुटका केली होती. त्यानंतर एका स्थानिक युट्यूब चॅनेलवर मेहबूब यांचा व्हिडिओ व फोटो व्हायरल केला होता.

हुक्केरी येथील जेएमएफसी न्यायालयासमोर हजर

गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवि नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक एस. आर. गणाचारी, ए. एस. मसरगुप्पी, एम. एस. कब्बूर, आर. एम. पडतारे, आर. यु. हणमण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या चौघा जणांना बेळगावात अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना ताब्यात घेऊन हुक्केरी येथील जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Advertisement

.