युट्यूबर ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज फेटाळला
वृत्तसंस्था/ हिसार
हरियाणाच्या हिसार येथील स्थानिक न्यायालयाने युट्यूबर ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ज्योतीने हिसार न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. ज्योतीचे वकील कुमार मुकेश यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करत पोलिसांनी सादर केलेल्या पुरावे व कागदपत्रांमध्ये कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे म्हटले होते. मात्र, तपास यंत्रणांनी ज्योती मल्होत्राच्या जामिनाला तीव्र आक्षेप नोंदवत सखोल पुरावे सापडल्याचे सांगतानाच अजूनही विविध पैलूंच्या माध्यमातून तपास करण्याची गरज व्यक्त केली आहे.पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली असून अजूनही कसून चौकशी सुरू आहे.
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला संवेदनशील माहिती पाठवत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. ज्योती मल्होत्रा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानशी संपर्कात होती आणि गुप्त माहिती शेअर करण्यासाठी तिला आर्थिक लाभ देखील देण्यात आला होता, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांनी तिला देशद्रोह आणि अधिकृत गुप्तहेर कायद्यांतर्गत अटक केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने तिला सध्या तरी दिलासा देण्यास नकार दिला आहे.