सैन्यभरतीसाठी तरुणाईचा खडतर प्रवास
9 राज्यांतील हजारो तरुण बेळगावमध्ये दाखल : कॅम्प परिसरात जागा मिळेल तेथे तरुण करताहेत वास्तव्य : 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार भरती प्रक्रिया
बेळगाव : सैन्यात भरती होण्यासाठी तरुणाईचा खडतर प्रवास सुरू आहे. केवळ 310 जागांसाठी 9 राज्यांतील हजारो तरुण बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. ना राहण्याची, ना खाण्याची व्यवस्था, मिळेल तिथून पिण्याचे पाणी पिण्याची वेळ भविष्यातील सैनिकांवर आली आहे. शहरात जागा मिळेल तिथे हे तरुण आसरा घेताना दिसत आहेत. बेळगाव रेल्वेस्थानकावर परराज्यातील हजारो तरुण दाखल होत असून मुख्य प्रवेशद्वारासोबत सर्वत्र आसरा घेताना दिसत आहेत. प्रादेशिक सेनेच्यावतीने बेळगावमध्ये भरती प्रक्रिया राबविली जात आहे. दि. 4 ते 12 नोव्हेंबर दरम्यान बेळगावच्या सीपीएड् मैदानानजीक प्रत्येक विभागवार भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
गैरसोयींमुळे तरुणांचे हाल...
भरती मैदानाजवळच राहिल्यास पोहोचण्यास विलंब होणार नाही, या उद्देशाने कॅम्प परिसरात जागा मिळेल तेथे तरुण वास्तव्यास आहेत. परंतु याठिकाणी शौचालय, पिण्याचे पाणी, तसेच खाद्यपदार्थ लवकर उपलब्ध होत नसल्यामुळे तरुणांची गैरसोय होत आहे. हॉटेलमध्ये सांगतील त्या दराने खाद्यपदार्थ खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे या तरुणांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे होते.
भरतीचे वेळापत्रक
- तारीख विभाग
- गुरुवार दि. 7 कर्नाटक-दक्षिण कर्नाटक
- शुक्रवार दि. 8 राजस्थान
- शनिवार दि. 9 राजस्थान
- रविवार दि. 10 कर्नाटक-उत्तर कर्नाटक (बेळगाव)
- सोमवार दि. 11 महाराष्ट्र
- मंगळवार दि. 12 महाराष्ट्र