इन्स्टाग्राम लाईव्ह करत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला
कोल्हापूर
इन्स्टाग्रामवर मित्रांसोबत लाईव्ह करत महाविद्यालयीन तरुणाने छत्रपती शिवाजी पुलावरुन पंचगंगेत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. हर्षवर्धन विजय सुतार (वय 21 रा. राजोपाध्येनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास हर्षवर्धनचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षवर्धन सुतार ताराबाई पार्कातील एका महाविद्यालयामध्ये बीबीएचे शिक्षण घेतो. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हर्षवर्धनने इन्स्टाग्राम अकाउंटवर मित्र मैत्रिणींना लाईव्ह येण्यास सांगितले. काही वेळातच त्याचे मित्र लाईव्ह आले. काही कळण्याआधीच हर्षवर्धनने छत्रपती शिवाजी पुलावरुन उडी मारली. काही वेळातच मित्र शिवाजी पुलावर दाखल झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षवर्धन मिळून आला नाही. रात्री उशिर झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली. सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास नदीमध्ये हर्षवर्धनचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. हर्षवर्धनच्या पश्चात वडील, लहान भाऊ, आजी, मामा, मामी असा परिवार आहे.