For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mahabaleshwar Trekkers | २०० फूट खोल दरीत पडलेल्या युवकाला मिळाले नवजीवन; प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांच्या धाडसी मोहिमेला यश

12:40 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
mahabaleshwar trekkers   २०० फूट खोल दरीत पडलेल्या युवकाला मिळाले नवजीवन  प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम  महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांच्या धाडसी मोहिमेला यश
Advertisement

दरीत कोसळलेल्या युवकाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

Advertisement

प्रतापगड : महाबळेश्वर-प्रतापगड मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेत २०० फूट खोल दरीत कोसळलेल्या युवकाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि महाबळेश्वर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोठी दुर्घटना टळली असून युवकाला अक्षरशः नवजीवन मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये कामासाठी येत असलेला एक युवक आंबेनळी घाटातील मेटतळे धबधब्याजवळील परिसरात लघुशंकेसाठी थांबला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो अंदाजे २०० फूट खोल दरीत कोसळला. मद्यप्राशन केल्यामुळे तो दरीत पडल्यावर त्याच ठिकाणी झोपून राहिल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

दरम्यान, संबंधित युवक दरीत पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिसराची पाहणी करून महाबळेश्वर पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली.

त्यानंतर बचाव मोहिमेसाठी आवश्यक रोप रेस्क्यू सेटअप उभारण्यात आला. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. खोल दरी, अंधार, सतत सुरू असलेला पाऊस आणि घसरडा परिसर यामुळे ही मोहीम अत्यंत धोकादायक ठरत होती. रोपच्या साहाय्याने बचाव पथकातील सदस्य दरीत उतरले आणि जखमी युवकाचा शोध सुरू केला.

काही वेळातच युवक जखमी अवस्थेत आढळून आला. त्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्यही घटनास्थळी दाखल झाले. पावसामुळे दरीतील उतार अत्यंत घसरडे झाले होते. त्यामुळे जखमी युवकाला स्ट्रेचरमध्ये सुरक्षित ठेवून वर आणणे हे मोठे आव्हान होते. मात्र सर्व सदस्यांनी समन्वय राखत अथक परिश्रम घेतले आणि तब्बल अडीच तास चाललेल्या मोहिमेनंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास युवकाला सुरक्षितपणे मुख्य रस्त्यावर आणण्यात यश मिळविले.

घटनेदरम्यान महाबळेश्वर पोलिस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. बचावकार्य सुरू असताना परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. युवकाला दरीतून बाहेर काढताच तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने तो शुद्धीत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

आंबेनळी घाट हा खोल दऱ्या, तीव्र वळणे आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात येथे अपघातांचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि समन्वय यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले. या यशस्वी मोहिमेनंतर सर्व स्तरांतून बचाव पथकांचे कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.