इस्लामपूरमध्ये चाकूने भोसकून तरुणाचा खून
इस्लामपूर :
यल्लम्मा चौक परिसरातील रेणुका मंदिरामागील रस्त्यावर किरकोळ कारणावरून गौरव हेमंत कुलकर्णी (24 डॉ. गोसावी हॉस्पिटलजवळ, कचरे गल्ली) याचा चाकूने भोकसून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. यात तिघांचा सहभाग असून पोलिसांनी त्यांना अटक केली. मंगळवारी दुपारी पोलिसांनी शहरातून आरोपींना घटनास्थळी चालवत नेवून तपास केला.
सौरभ सुशिल पाटील (रा. इस्लामपूर), साजिद जहांगीर इनामदार (रा. गोटखिंडी ता. वाळवा), (विजय धुलुगडे रा. इस्लामपूर) अशी संशयीतांची नावे आहेत. मृत गौरव कुलकर्णी याचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता. 26 रोजी गौरव त्याचा मित्र जुबेर मुजावरसोबत कापूसखेड नाका येथे फिरत असताना संशयित सौरभ पाटील याने तु जुबेर सोबत का फिरतो? तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली होती. 27 रोजी रात्री सौरभने गौरवला फोनकरुन तुझ्याशी जरा बोलायचे आहे, यल्लम्मा चौक येथे ये, असा निरोप दिला. गौरव मिलन फॅब्रीकेशन येथे थांबलेल्या मित्र प्रतिक कमतगीकडे गेला व त्याने सौरभ पाटील याने बोलवल्याचे सांगितले.
थोडयाच वेळात सौरभ पाटील, साजिद इनामदार, विजय धुलुगडे आले. गाडीवरुन उतरुन सौरभने गौरवच्या पाठीवर हात टाकून बोलत-बोलत बाजूला नेले. त्याच्या पाठोपाठ साजिद व विजय धुलुगडे होते. कमतगी तिथेच बाजूला उभा राहून हे पहात होता. अचानक गौरव कुलकर्णी हा ‘मला सोडा, मी आता जुबेर मुजावर सोबत फिरणार नाही, मला मारु नका’ असे जोराने ओरडत होता. कमतगी त्यांच्याजवळ गेला व भांडणे करु नका, असे समजावत असताना सौरभ पाटीलने त्यास मागे ढकलून ‘गौऱ्याला आज संपवायचं आहे’ असे म्हणाला. यावेळी इनामदार व धुलुगडे यांनी गौरवच्या दोन्ही हातास धरले. सौरभ पाटीलने चाकूने पोटात भोकसले. गौरव जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या पाठीमध्ये चाकूने भोसकून तिघेजण लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करीत निघून गेले.
त्यानंतर कमतगी व त्याचा मित्र राजनाथ गोसावी यांनी गौरव यास उचलून उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मृत गौरव यास प्रणव कुलकर्णी हा जुळा भाऊ असून तो पुणे येथे खाजगी नोकरी करतो. साडेदहाच्या सुमारास गौरवचे वडील हेमंत कुलकर्णी व कुटुंबीय झोपले असता, सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास प्रणवने फोन करुन वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर हेमंत कुलकर्णी व पत्नी राधिका यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धावले. गौरवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी हेमंत कुलकर्णी यांनी इस्लामपूर पोलीसात वर्दी दिली. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व सहकाऱ्यांनी तपासाला गती देत तिन्ही आरोपींना काही तासातच अटक केली.
आरोपी व पोलिसात झटापट
पोलिसांना संशयीत आरोपी हल्ला करुन कामेरीतून कोल्हापूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. हारूगडे काही अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कामेरीला गेले. त्यावेळी तिघेही आरोपी शेताच्या कडेला उभे असल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी हारुगडे यांच्यासह अमोल सावंत, शशिकांत शिंदे, दिपक घस्ते, विशाल पांगे गेले असता, आरोपींनी त्यांच्याशी झटापट करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हारुगडे व सावंत यांना दुखापत झाली. त्यातूनही पाठलाग करून तिन्ही आरोपींना जेरबंद केले.