For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा!

12:31 PM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
युवकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली

Advertisement

पणजी : खूप वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प म्हणजे आंबेडकर भवन. लवकरच पर्वरीत आंबेडकर भवन 2140 चौ.मी जागेत उभे राहणार असून याबद्दलचे दस्तावेज सुपूर्द करण्यात आले असून यासाठी लागणारा 10 कोटीचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यात आंबेडकर भवनाची पायाभरणी करण्यात येईल आणि त्यानंतर आमच्या या  कार्यकाळातच हे आंबेडकर भवन उभे राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षांविरुद्ध लढण्याचा संदेश दिला आहे, त्यानुसार कुठेही अन्याय घडत असेल तर युवकांनी आवाज उठवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा व समाज कल्याण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर उद्यान पाटो पणजी येथे आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, राज्याचे सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते, समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, ओबीसी महामंडळाचे एम.डी. चंद्रकांत शेटकर, पेडणेचे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, सांगेच्या नगराध्यक्ष गडकर, अनुसूचित जाती व जमातीचे आयुक्त दीपक करमळकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

सर्व सुविधा उपलब्ध करणार

आंबेडकर भवनात समाजाकरिता हॉस्टेल सुविधा, कौशल्य निर्माण करण्यात येतील. अन्य अनेक सुविधा यात उपलब्ध करण्यात येतील. संपूर्ण गोव्यातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी धडपड करत असतील आणि त्यात त्यांना काही समस्या येत असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शिक्षण घेण्यासाठी गोमेकॉ किंवा विद्यापीठात हॉस्टेल मिळत नसेल तर या आंबेडकर भवनात ती सोय करण्यात येईल.

जात प्रमाणपत्र पडताळणी महत्त्वाची 

गोवा अनुसूचित जाती आणि जमाती 2010 कायदा हा व्यवस्थितरित्या अंमलात यावा यासाठी प्रयत्नशील आहे. कुणावरच अन्याय होऊ नये यासाठी गोवा अनुसूचित जाती आणि जमाती आयोग चांगल्याप्रकारे कार्य करत आहे. गोवा जात प्रमाणपत्र पडताळणी कायद्यांतर्गत जात प्रमाणपत्राची पडताळणी करणे गरजेचे आहे. जात प्रमाणपत्रात कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य होऊ नये यासाठी पडताळणी करून जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

युवकांनी आवाज उठवावा

आजच्या तऊण पिढीने शिक्षण घ्यायची गरज आहे. त्याचबरोबर अन्याय जर होत असेल तर त्यावर आवाज उठविण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. अल्पसंख्याकांचे हक्क मिळावे यासाठी संविधानात तरतूद केली आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे आंबेडकर भवनाचे दस्तावेज सुपूर्द केले. तसेच एकनाथ परवार, शाबा परवार, तुकाराम तांबोस्कर, उत्तम रेडकर यांचा समाजमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

भारतीय घटनेचे शिल्पकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. अंत्योदय तत्त्वाच्या आधारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कसे पोहचता येईल याबद्दल विचार करून घटना तयार केली. प्रत्येक योजना, सुविधांचा लाभ गोमंतकीयांना मिळावा यासाठी समाजकल्याण खाते प्रयत्नशील आहे. प्रत्येक पंचायत, नगरपालिकेत समाजकल्याण खात्याच्या योजनांची माहिती मिळावी यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आला असल्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांगांसाठी विशेष योजना

डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या आधारावर मोठी लोकशाही दिली. भारत आज विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कणखर व्यक्तिमत्त्वातून पुढे जाण्याची गरज आहे. दुर्गम भागात समाजकल्याण खात्याच्या योजना पोहचाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विविध योजनांचा लाभ गोमंतकीयांनी घेणे गरजेचे आहे. याचबरोबर दिव्यांगांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा. गोव्यात लवकरच आंबेडकर भवन उभारण्यात येणार असून यातदेखील समाजातील मुलांसाठी सुविधा उपलब्ध असतील असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.