तरुणांनी छत्रपती शिवरायांचे आदर्श आचरणात आणावेत
रमाकांत कोंडुस्कर यांचे प्रतिपादन, डीवायएसपी नारायण बरमणी यांच्या उपस्थितीत पै कामेश पाटीलचा सत्कार
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून त्यांच्या आचारविचारांचा आदर्श घेवून आपल्या शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राबरोबर इतर क्षेत्रातही यशस्वी होण्याचे विचार म.ए.समितीचे व श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगावचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केले. कंग्राळी खुर्द गावचे मल्ल कामेश पाटीलने म्हैसूर येथे नुकत्याच झालेल्या दसरा क्रीडा स्पर्धेमध्ये कंठीरवा केसरी किताब मिळविल्याबद्दल कंग्राळी बुद्रुक येथील वसुंधरा मंगल कार्यालयामध्ये बुधवारी कामेशचा नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर बेळगावचे डीवायएसपी नारायण बरमनी, मार्कंडेय साखर कारखाना अध्यक्ष आर. आय. पाटील, कोल्हापूरचे राशिवडे वस्ताद, सागर चौगुले, चेतन बुध्यान्नावर, ग्राम पंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, महेश डुकरे, कर्नाटक केसरी कृष्णा पाटील, शंकर पाटील, ग्रा.पं.सदस्य जयराम पाटील, बेळगाव कुस्तीगीर संघटनेचे महेश बिर्जे उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज श्री हनुमान मूर्ती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कंठीरवा केसरु मिळविलेल्या कामेश पाटील, सुवर्णपदक मिळवलेला प्रेम जाधव, महिला कुस्तीपटू भक्ती पाटील, स्वाती पाटील, महेश बिर्जे, विनायक पाटील आदी मल्लांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, बेळगाव, राशिवडे, सावगाव कुस्ती संघटना, तालिम मंडळे, विविध संघ संस्था, भजनी मंळे, नातेवाईक, मित्रपरिवार आदींनी गौरव करून प्रोत्सहन दिले. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला होता. परंतु आता शासन व कोकश्रयाची गरज आहे, असे विचार व्यक्त करून कुस्तीपटूंना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डीवायएसपी नारायण बरमणी यांच्याकडे कुस्तीपटूंची मागणी
दावणगिरी मिनी कर्नाटक पोलीस दलाची कुस्ती टीम सराव करत असते. त्या टीममध्ये सराव करण्याची बेळगावच्या कुस्तीपटूंना संधी प्राप्त करून द्यावी, अशी विनंती डीवायएसपी नारायण बरमनी यांच्याकडे करण्यात आली, आपले सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
कामेशच्या आई-वडिलांचा सत्कार
यावेळी कामेश पाटीलचे वडील महादेव पाटील व आई उमा पाटील यांचाही उपस्थितांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला एनवायएस प्रशिक्षक प्रशांत पाटील, लक्ष्मण जाधव, सुशिल मुतगेकरसह कंग्राळी खुर्द, कोल्हापूर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी केले तर किरण पाटील यांनी आभार मानले.