सोन्याचा हार चोरल्याप्रकरणी युवकाला न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी
शहरातील खासकीलवाडा येथील बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार लंपास करणाऱ्या चोरट्याचा सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात छडा लावला. सोन्याचा हार चोरी प्रकरणी पोलिसांनी न्हावेली मेस्त्रीवाडी येथील महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री (वय २२ ) याला शुक्रवारी रात्र जेरबंद केले. संशयित अक्षय मेस्त्री याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शनिवारी त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खासकिलवाडा येथे धनश्री विजय चव्हाण या भाड्याने राहतात. ७ एप्रिल रोजी त्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.८ एप्रिल रोजी सायंकाळी चव्हाण या आपल्या खोलीकडे आल्या असता त्यांना आपल्या बंद खोलीचे पुढील दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून फिर्यादी चव्हाण हिने आपल्या पर्समध्ये ठेवलेल्या कपाट्याच्या चावीचा वापर करून लॉकर मधील ठेवलेले दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार चोरीस गेल्याचे आढळले. याबाबतची फिर्याद धनश्री चव्हाण हिने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्याची जबाबदारी प्रभारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी हाती घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार मुकुंद सावंत ,महेश जाधव व विष्णू सावळ यांच्या टीमने तपासाला गती दिली. घटनास्थळी संशयिताचा वावर, गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करत संशयित चोरट्याचा मागोवा घेत पोलिसांनी शुक्रवारी रात्र न्हावेली गावात सापळा रचून महादेव उर्फ अक्षय मेस्त्री गेला गजाआड केले. तसेच चोरीतील 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हारही हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. चोरट्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. चोरी प्रकरणी अक्षय मेस्त्री याला अटक करण्यात आली. शनिवारी त्याला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.