युवा म. ए. समितीच्या झेंड्याखाली युवक संघटित
मराठी भाषा, संस्कृती, मराठी शाळा टिकवण्यासाठी खानापुरातील बैठकीत चर्चा
खानापूर : खानापूर म. ए. समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक येथील शिवस्मारक येथे नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये युवकांनी मराठी भाषा, संस्कृती तसेच मराठी शाळा टिकवण्यासाठी एकत्र येण्याबाबत चर्चा केली. भविष्यात समितीच्या ध्येय धोरणाशी बांधील रहात मराठी भाषेसाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी प्रा. शंकर गावडा आणि म. ए. युवा समिती बेळगावचे चिटणीस प्रतिक पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शंकर गावडा यांनी सीमाप्रश्नाबद्दल माहिती दिली. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीचा इतिहास सांगितला. आपली मराठी भाषा, शाळा, मराठी संस्कृती टिकली पाहिजे, आणि ती जबाबदारी मराठी भाषिक युवकांनी आपल्या खांद्यावर घेऊन मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
युवा समिती चिटणीस प्रतीक पाटील म्हणाले की, सीमालढा गेल्या 70 वर्षांपासून आपण लढतो आहोत. त्याची सोडवणूक करून घेणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्याचवेळी शासनाने मराठी भाषा संपविण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करून मराठी शाळा बंद पडाव्यात यासाठी छुपा मार्ग निवडला आहे. मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा आहेत. याच मराठी शाळा टिकल्या पाहिजे, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे. गावोगावी मराठी संस्कृती संवर्धन करण्यासाठी युवक जागृत झाले पाहिजे, महाराष्ट एकीकरण युवा समिती गेल्या नऊ वर्षांपासून सीमाप्रश्न सोडवणुकीसोबतच या सीमाभागातील शाळांसाठी कार्यरत आहे. आणि याच प्रेरणेने खानापूर तालुक्यातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची जबाबदारी उपस्थित तरुणांनी स्वीकारून आपल्या कार्याची सुरुवात करावी.
यावेळी युवा समितीचे पदाधिकारी साईनाथ शिरोडकर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सीमालढ्यात सोशल मिडीयाचा वापर, स्पर्धा परीक्षेचे महत्व आणि महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या आरोग्य सुविधा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सुनील पाटील, शुभम कांबळे, बाळकृष्ण पाटील, प्रसन्न पाटील, लक्ष्मण भातकांडे, वैभव कारेकर, संदेश कोडचवाडकर, प्रसाद देसाई, यतीन पाटील, मुकेश गुरव, आर्यन पाटील, लक्ष्मण शास्त्राr, राम चिखलकर, यश गावडे, प्रथमेश मेलगे, चेतन हंगीरगेकर, विकास पाटील, सोमनाथ गोरे, पृथ्वीराज गुरव, राहुल चापगावकर, आदित्य देसाई, ओंकार पाटील, सोमनाथ गोरे, राघोबा, राम चिखलकर, कपिल, दत्तराज, बापू, निखिल, हर्ष, सिमानी, परशुराम मुतगेकर आदी उपस्थित होते.