उचगाव भागातील युवापिढी चरस-गांजाच्या आहारी
विक्रीची मोठी उलाढाल : पोलीस खात्याचे दुर्लक्ष : संबंधितांना गजाआड करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
उचगाव, तुरमुरी, कोणेवाडी, बसुर्ते, शिनोळी या परिसरात सध्या गांजा या नशेली पदार्थांच्या आहारी युवा पिढी गेल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. या भागात नशेली पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात मावा विक्रीची उलाढाल होत असून, पोलीस खाते याबाबत अद्याप निक्रिय आहे. बेळगाव शहरांमध्ये जशी पोलीस खात्याने मोहीम हाती घेतली आहे. तशाच प्रकारे ग्रामीण भागातही मोहीम हाती घेऊन नशेली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे. अशा प्रकारामुळे परिसरातील पालकवर्गात चिंता पसरली आहे.
संपूर्ण बेळगाव तालुक्यामध्ये पाहिले तर युवा पिढी दारूच्या नशेत झिंगताना दिसायची मात्र सध्याचे चित्र पाहिले तर हीच युवा पिढी गांजा या नशेली पदार्थांमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात गावागावांमधून गांजा विकणाऱ्या टोळ्या सध्या कार्यरत असून, या युवा पिढीला लागेल त्याप्रमाणे गांजाचा पुरवठा केला जातो. आणि या गांजाच्या नशेत सदर तरुण युवा पिढी सर्वत्र भरकटत असल्याचे दिसून येत आहे. या नशेमध्ये या भागात भुरट्या चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टी चैनी करण्यासाठी या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
याबरोबरच या भागातील आठवी, नववी, दहावीच्या वर्गात शिकणारी बारा-तेरा वर्षांचे विद्यार्थी सुद्धा या गांजामध्ये बळी पडत असून या नशेत अडकल्याचे अनेक विद्यार्थी सुद्धा दिसून येत आहेत. या नशेतच हे लहान विद्यार्थी सुद्धा स्वत:च्या घरातूनच चोऱ्या करत असल्याचेही प्रकार उघडकीला येत आहेत. चैनीसाठी पैसा हवा मग तो कसा मिळवायचा तर अशा प्रकारे चोऱ्या करायच्या आणि गांजा विकत घेऊन नशेत डोलत राहायचे. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गांजा विकणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. यासाठी काकती आणि वडगाव पोलिसांनी गांजा विकणाऱ्या टोळ्यांचा तपास करावा आणि त्यांना गजाआड तातडीने करावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी आणि पालक वर्गातून करण्यात येत आहे.