Sangli : कवठेपिरान येथे अपघातात सांगलीच्या युवकाचा मृत्यू
कवठेपिरान- दुधगाव रस्त्यावर ट्रॅजिक अपघात; युवक ठार
सांगली : रस्त्याकडेला लावलेल्या चारचाकी चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने मागून येणाऱ्या दुचाकीस धडक बसल्याने रस्त्यावर पडलेल्या युवकास समोरुन येणाऱ्या ट्रकने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावरील भिमराव माने यांच्या घरासमोर अपघात घडला.
यामध्ये ओंकार श्रीधर लोखंडे (रा. खणभाग, सांगली) असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चारचाकी आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघाताबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सौरभ श्रीधर लोखंडे (रा. खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी सौरभ यांचा भाऊ मयत ओंकार हा घरगुती बिस्कीट विक्री करण्याकरिता बुधवारी सकाळी वडगाव येथे दुचाकीवरुन (क्र. एमएच १० डीव्हाय २४६१) निघाला होता. कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावरील कवठेपिरान येथील भिमराव माने यांच्या घरासमोर तो आला. त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर हणमंत आप्पा परियावर (रा. व्हंकलकुंड, ता. गुलबर्गा, जि. कोप्पाळ, रा. कर्नाटक) यांनी चारचाकी (क्र. एमएच ०९ एफव्ळी ५१०९) लावली होती.
ओंकार चारचाकीच्या नजीक आला असता चालक परियावर यांनी अचानक चारचाकीचा रस्त्याकडील दरवाजा उघडला. यामुळे ओंकार दरवाजाला धडकून रस्त्यावर फेकला गेला. नेमक्या त्याच वेळी दुधगावकडून कवठेपिरानकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची त्यास धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ओंकार याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा केला असून ट्रक चालक तात्यासो भोपाल चौगुले (रा. दुधगाव) व चारचाकी चालक हणमंत परियावरवर गुन्हा दाखल केला.