For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोर्लाघाटात जीप अपघातात बेळगावाच्या युवकाचा मृत्यू

06:07 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
चोर्लाघाटात जीप अपघातात बेळगावाच्या युवकाचा मृत्यू
Advertisement

गाडीतील अन्य दोघेजण जखमी : गोमेकॉत उपचार सुरू

Advertisement

वाळपई प्रतिनिधी

गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट मार्गावर जीप गाडी अपघातात बेळगाव येथील संकेत बबन लोहार (27, रा. गांधीनगर, बेळगाव) या युवकाचा मृत्यू झाला. शनिवार दि. 6 रोजी सकाळी ही घटना घडली गोवा हद्दीतील केरी गावापासून अवघ्याच अंतरावर एका वळणावर हा अपघात घडला. गाडीत बसलेले अन्य दोघेजण जखमी झाले. त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, संकेत लोहार हा आपली क्रेटा जीप (केए -22- सी -9732)  घेऊन बेळगावातून गोव्याच्या दिशेने येत होता. केरीनजीक एका वळणावर आला असता त्याचा ताबा सुटून गाडीची डाव्या बाजूच्या झाडाला धडक बसली. यामध्ये बाजूच्या झाडाचे लाकूड बसून काच तुटली व मयत संकेतच्या डोक्यावर आदळले. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो गंभीर जखमी झाला. तर त्याच्या गाडीमध्ये असलेले अन्य दोघे जण जखमी झाले. सदर धडक एवढी जोरदार होती की जीप गाडीची समोरील काच फुटली व एका बाजूचे मोठे नुकसान  झाले.

अपघाताच्या दरम्यान या मार्गाने जाणाऱ्या काही प्रवाशांनी या घटनेची माहिती केरीतील नागरिकांना दिली. त्यानंतर काही प्रवाशांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान या संदर्भाची माहिती मिळताच केरी पोलीस चौकीवरील पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान 108 वाहनाने जखमी संकेत लोहार व अन्य दोघांना सांखळी येथील सरकारी  ऊग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संकेत लोहार याला मृत घोषित केले. अन्य दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पंचनामा केल्यानंतर संकेत याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आलेली आहे. वाळपई पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

घाट मार्गावर वाहन चालवताना सावधान!

सध्या चोर्ला घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागत आहे. यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याचा साठा झालेला आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. कारण दुचाकी चालकांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत. दरडीची माती रस्त्यावर येऊन चिखल परिस्थिती निर्माण होत असते. सावधगिरीने वाहने न चालविल्यास अपघात घडण्याचा धोका असतो. यामुळे या महामार्गावरून वाहने चालविताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन  पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे

घाट परिसरात पावसाळ्यात धबधबे कोसळत असल्यामुळे अनेकजण या धबधब्यावर आंघोळीसाठी जात असतात. यावेळी अनेक वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवली जातात. यामुळे अपघात घडण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे. यामुळे पोलिसांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी  वाहनचालक व  नागरिकांकडून करण्यात आलेली आहे.

Advertisement

.