Satara News : बेळगावच्या युवकाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या
वाघोली जवळ रेल्वे अपघात, IT कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
सातारा : तडवळे सङ वाघोली (ता. कोरेगाव) येथे रविवारी, ७ रोजी पहाटे रेल्वे अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाठार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, वाठार-सालपे रेल्वे अप लाईनवरील तडवळे हद्दीत रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सोलापुरे (वय ३२, रा. बेळगाव, कर्नाटक) असे रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचे दोन्ही पाय तुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाआहे. गिरीशकुमार हा पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होता. घटनास्थळी पोलिसांना कन्नड भाषेत लिहिलेली चिठ्ठी आढळली असून त्यातील मजकूर काय लिहीला आहे, याची खात्री पोलीस करत आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पिंपोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाने हा टोकाचा निर्णय का घेतला, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याची फिर्याद रेत्येचे सहायक फौजदार अशोक मारुती हजारे यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सातारला येणार असल्याचे गिरीशकुमारने सांगितले नव्हते
गिरीशकुमार हा अविवाहित असून तो १० वर्षापासून पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करत होता. त्याचे कोणाशी वाद अगर वैर नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याने अगोदरची आयटी कंपनी सोडून नवीन आयटी कंपनीत काम मिळाले आहे. सोमवारी तेथे रुजू होणार असल्याचे फोनवरून भावाला शनिवारी रात्री नऊ वाजता सांगितले होते. मात्र साताऱ्यात येणार असल्याची कल्पना दिली नव्हती. नवीन कंपनीत जॉब मिळाला असून कंपनीने नवीन लॅपटॉप दिला असल्याचे गिरीशकुमारने सांगितले होते. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांना धक्का बसला आहे.