कोरेगावच्या आझाद चौकामध्ये भर दिवसा युवकाचा खून
कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, खुनाचे कारण अस्पष्ट
सातारा
कोरेगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या आझाद चौक येथे नवीन एस. टी. स्टँड रस्त्यावरील एका कपडे विक्री करण्राया दुकानामध्ये प्रतिक राजेंद्र गुरव वय २४, रा. ल्हासुर्णे याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी ल्हासुर्णे गावातील ओंकार संजय जाधव याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
याप्रकरणी प्रत्यक्ष घटनास्थळावरून आणि पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक राजेंद्र गुरव हा कोरेगाव शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. ओंकार संजय जाधव हा त्याचा जवळचा मित्र होता, ओंकार याचे कोरेगावात कपडे विक्रीचे दुकान आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता प्रतिक हा दुकानात कामाला जातो म्हणून ल्हासुर्णे येथील घरातून बाहेर पडला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र गुरव यांनी त्यांचा लहान मुलगा अजय याला मोबाईल वरून कॉल करून सांगितले की, तू ताबडतोब ताबडतोब ओंकार जाधव याच्या कपड्याच्या दुकानात जा. त्याप्रमाणे अजय त्या दुकानासमोर पोहोचला असता त्याला दुकान बंद असल्याचे दिसले. दुकानासमोर ओंकार जाधव आणि संजय जाधव हे दोघे उभे होते. दुकानाचे शटर उघडून आत गेल्यावर दुकानाच्या एका कोप्रयामध्ये प्रतिक बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. त्याच्या गळ्याभोवती काळे निळे व्रण पडले होते. त्यानंतर अजय व त्याचे वडील राजेंद्र गुरव या दोघांनी खाजगी गाडीमध्ये घालून प्रतिक याला शहरातील खाजगी रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिक्रायांनी तपासणी करून शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिक्रायांनी तपासणी केली व प्रतिक याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी अजय राजेंद्र गुरव यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये नमूद केले आहे की, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओंकार संजय जाधव याने संगनमत करून प्रतिक राजेंद्र गुरव याचा कशाच्या तरी साह्याने गळा आवळून खून केला आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.