बैलहोंगलमध्ये तरुणाचा विळा-जांबियाने खून
13 जणांना अटक, मयताच्या आईलाही मारहाण
बेळगाव : क्षुल्लक कारणावरून बैलहोंगल येथील एका तरुणाचा भीषण खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून यासंबंधी 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विळा, जांबिया व बियर बाटलीने हल्ला करून त्या तरुणाचा खून करण्यात आला आहे. रवी इराप्पा तिम्मण्णावर (वय 23) रा. आश्रय कॉलनी, बैलहोंगल असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सायंकाळी झालेल्या भांडणाचे पर्यवसान रात्री खुनात झाले आहे. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, पोलीस निरीक्षक पी. व्ही. सालीमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोविंद ऊर्फ अज्जाप्पा कलादगी, भीमाप्पा ऊर्फ भीम कलादगी, बसवराज कलादगी, सोमनिंग कलादगी, विजय ऊर्फ उमेश कलादगी, द्यामप्पा ऊर्फ द्याम पाटील,
मनोज पाटील, चेतन अंगडी, जगदीश माकार सर्व राहणार आश्रय कॉलनी, बैलहोंगल, पृथ्वी हुलमनी, गंगाप्पा हुग्गी, युसुफ चंद्रू ऊर्फ चंद्या सर्व रा. इंदिरानगर, बैलहोंगल या तेरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. खून झालेला रवी व सोमनिंग कलादगी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. रविवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता रवी व आरोपी मनोज पाटील यांच्यात क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली होती. रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास 13 जणांनी रवीवर हल्ला केला. मनोजकडे डोळे वटारून का पाहिलास? अशी विचारणा करीत विळा, जांबिया व बियर बाटलीने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. हल्ला होताना सोडविण्यासाठी गेलेली रवीची आई निलव्वा इराप्पा तिम्मण्णावर (वय 48) हिलाही मारहाण करण्यात आली आहे. बैलहोंगल पोलीस पुढील तपास करीत आहेत.