युवानेते शुभम शेळकेंना अटक-जामीन
खडेबाजार पोलीस स्थानकातील जुने प्रकरण
बेळगाव :
म. ए. समितीचे युवानेते शुभम शेळके यांना या ना त्या कारणाने अडचणीत आणण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात दाखल झालेल्या एका प्रकरणातील वॉरंटवरून शनिवारी त्यांना अटक करण्यात आली. सायंकाळी न्यायालयाने जामीनही मंजूर केला. चौकशीसाठी म्हणून शुभम शेळके यांना माळमारुती पोलीस स्थानकात बोलाविण्यात आले होते. काही तास पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले. नंतर खडेबाजार पोलीस तेथे दाखल झाले. न्यायालयाच्या कामकाजाला तुम्ही हजर राहिला नाही, तुमच्यावर वॉरंट आहे, असे सांगत त्यांना अटक करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अॅड. महेश बिर्जे यांनी जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची सुटका झाली. यासाठी अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. अश्वजित चौधरी आदींनी प्रयत्न केले.