दोडामार्गच्या विकासासाठी युवकांचे ‘दोडामार्ग क्रांती दल’ सक्रिय
दोडामार्ग : “एक विचार... एक संघर्ष... एक ध्यास... जनतेच्या हक्कासाठी लढा!” या भूमिकेतून दोडामार्ग तालुक्यातील युवकांनी एकत्र येत ‘दोडामार्ग क्रांती दल’ (DKD) या संघटनेची स्थापना केली आहे. तालुक्यातील मूलभूत प्रश्न तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासोबतच गरज पडल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रस्ते सुरक्षित करणे, दोडामार्ग तालुका क्रीडा संकुलाचे रखडलेले काम पूर्ण करणे आणि गणेशोत्सव काळात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे, या प्रमुख मागण्यांसाठी दोडामार्ग क्रांती दलाच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
गणेश चतुर्थीच्या काळात दोडामार्ग तालुक्यात स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांची आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, दोडामार्ग-विजघर मार्गासह तालुक्यातील अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी आणि काटेरी झुडपे यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचा दावा युवकांनी केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत, आवश्यक ठिकाणी डांबरीकरण व दुरुस्ती करावी, रस्त्यालगतची झाडी हटवावी आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
दोडामार्ग-विजघर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाने संयुक्त पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
सहा वर्षांनंतरही क्रीडा संकुलाचा प्रश्न कायम
दोडामार्ग तालुका क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामाबाबतही युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन सुमारे सहा वर्षे उलटूनही क्रीडा संकुलाचा अपेक्षित उपयोग स्थानिक खेळाडूंना होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मैदानाची दुरवस्था असून धावपट्टी, चेंजिंग रूम, प्रशासकीय सुविधा तसेच अन्य आवश्यक मूलभूत सोयींचा अभाव असल्याने खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
क्रीडा संकुलाची तातडीने पाहणी करून आतापर्यंत झालेल्या कामाचा आणि खर्च झालेल्या निधीचा सविस्तर आढावा घ्यावा, खेळाडूंसाठी आवश्यक मैदान व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच निधीचा योग्य वापर झाला आहे का, याबाबत संबंधित विभागाने माहिती द्यावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.
“खेळाडूंसाठी मैदान उभे करा, केवळ घोषणा नको,” अशी भूमिका घेत संघटनेने ९ सप्टेंबर २०२६ पासून दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
गणेशोत्सवात अखंडित वीजपुरवठ्याची मागणी
गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने वीजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने पूर्वतयारी करून सणाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्व गावांमधील वीजखांब, विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि इतर विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत. संभाव्य बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करता यावी यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवावे, अशी मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
“निवेदनांपुरते मर्यादित राहणार नाही”
रस्ते, वीज आणि क्रीडा सुविधा हे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी तसेच तालुक्याच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे सांगत, केवळ निवेदने देऊन न थांबता प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका दोडामार्ग क्रांती दलाने घेतली आहे.
“एक विचार... एक संघर्ष... एकच ध्यास... जनतेच्या हक्कासाठी लढा!” या घोषवाक्याखाली तालुक्यातील विविध विकासकामांसाठी संघटना सक्रिय राहणार असल्याचे युवकांनी सांगितले.
यावेळी अजय गावडे, वैभव गवस, अंकुश म्हाडगुत, इलियास लोबो, राज गवस, तेजस गवस, सार्थक दळवी, साहिल गवस, विशाल गवस, दर्शन गवस, ओम ठुमरे, हर्ष ठुमरे, सूरज नाईक, करण डेगवेकर, आदित्य दळवी, रोहित सावंत, नारायण गवस, गौरेश गवस, प्रवीण गवस, सागर सावंत, रामा सुतार, गणेश काळे, आयुष गवस, आदित्य मयेकर, आर्यन दळवी आणि लक्ष्मण दळवी यांच्यासह दोडामार्ग क्रांती दलाचे युवक उपस्थित होते.