चापोली-काणकोण अपघातात युवक ठार, दोन गंभीर जखमी
प्रतिनिधी/ काणकोण
चापोली, काणकोण येथे 6 रोजी पहाटे 3 च्या दरम्यान झालेल्या अपघातात एका चारचाकी वाहनाने समोरच्या दगडाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे राजबाग, तारीर येथील रविश राजेंद्र कोमरपंत (24 वर्षे) हा युवक ठार झाला, तर अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील दिव्या ठाकूर आणि बेंगळूर येथील रिक्षित राज व रविश हे तिघे मिळून चापोली येथे गेले होते. मयत रविश हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई, काका, काकी असा परिवार आहे. रिक्षित हा राजबाग, तारीर येथील एका हॉटेलच्या मालकाचा मित्र आहे, तर दिव्या ही इंदोर येथे ‘डीजे’चे काम करते. तिघेही चापोली येथे का गेले होते याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
सध्या चापोली हा प्रेमी युगुलांचा अ•ा बनलेला आहे. त्याशिवाय तेथे सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसत असून या ठिकाणी अनैतिक गोष्टी घडत असाव्यात असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काणकोणच्या पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी काणकोणच्या काही जागरुक नागरिकांनी केली आहे. वरील अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काणकोणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. जखमी व्यक्तींना मडगावच्या इस्पितळात उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. काणकोणचे पोलिस पुढील तपास करत आहेत.