रेड्याच्या हल्ल्यात युवक जागीच ठार
वेलसांवमध्ये घडली घटना : चवताळलेल्या रेड्याने युवकाच्या शरीरात खुपसली शिंगे
प्रतिनिधी / वास्को
रेड्याच्या हल्ल्यात एका युवकाला जीव गमवावा लागण्याची घटना शनिवारी वेलसांव भागात घडली. गायब झालेल्या रेड्याला शोधताना ही घटना घडली. आपल्याला शोधणाऱ्या युवकाला पाहून रेडा चवताळला व त्याने त्याच्यावर हल्ला केला. शरीरात विविध ठिकाणी शिंगे खुपसल्याने तो युवक जागीच ठार झाला. मयत युवकाचे नाव मेहबूब वालीकर (32) असे असून तो झुआरीनगर बिर्ला भागात राहणारा आहे.
शनिवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. उपलब्ध माहितीनुसार मयत मेहबूब वालीकर व त्याचा अन्य एक सहकारी वेलसांवच्या बेळे गावातील काही रेड्यांचा सांभाळ करीत होते. त्यापैकी पाच वर्षांचा एक रेडा शुक्रवारी रात्रीपासून गायब होता. या रेड्याला ते दोघे रात्री व काल दुपारपर्यंत शोधत राहिले. संध्याकाळी चारच्या सुमारास त्याला शोधता शोधता ते दोघेही युवक
बेळेतील तळ्याकडे पोहोचले. तिथे तो रेडा तळ्यात उतरलेला त्यांना दिसला. त्यामुळे मयत मेहबूब हा त्या रेड्याला आणायला तळ्याकडे जाऊ लागला. मेहबूब आपल्याला नेण्यासाठी येत असल्याचे पाहून रेडा चवताळला. त्याने तळ्यातून बाहेर पडत थेट मेहबूबवर हल्ला केला. त्याच्या जांघांमध्ये, छातीत, खांद्यांमध्ये तसेच पाठीवरही रेड्याने शिंगे खुपसली. रेड्यापासून आपला जीव वाचवण्याची त्याला संधीच मिळाली नाही. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या सहकाऱ्याने आरडा-ओरड करून जवळच्या लोकांना बोलावले. रक्ताने माखलेल्या मेहबूबला कासांवलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक गुरूदास कदम व वेर्णाचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिसियोमध्ये पाठवून दिला. वेर्णा पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले आहे.