विजेच्या धक्क्याने युवक जागीच ठार
पालखी मिरवणुकीच्या सजावटीवेळी घडला प्रकार
मडगाव : दवर्ली येथील श्री दत्त महाराज मंदिराच्या पालखी मिरवणुकीसाठी सजावट करण्यासाठी वर चढला असताना अनिकेत नाईक (वय वर्षे 20) हा एका उघड्या हायटेन्शन इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आला आणि विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची भीषणता सांगताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनिकेत नाईक हा युवक श्रीदत्त महाराजांच्या वार्षिक पालखी मिरवणुकीसाठी परिसर सजवणाऱ्या गटाचा भाग होता. तो एक कुशल क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात असे. जेव्हा तो वर चढला तेव्हा त्याला लगेचच विजेचा धक्का बसला आणि उंचावरून पडण्यापूर्वीच तो अडकला. त्याला तातडीने दक्षिण गोवा जिल्हा ऊग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या परिसरात विद्युत विभागाचे काम सुरू असल्याने वीजवाहिनी धोकादायक पद्धतीने उघडी पडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. वीज खात्याने कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळेच अशी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.