शिरशिंगेत गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी
सावंतवाडी । प्रतिनिधी
तालुक्यातील शिरशिंगे राणेवाडी येथील रहिवासी स्वप्निल सुनील सावंत हा युवक गवा रेड्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला. ही घटना आज सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास घडली . याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून शिरशिंगे येथे आपल्या गावी दुचाकीवरून परतत असताना सकाळी ८.३० च्या सुमारास शिरशिंगे जलमदेव परिसरात गवा अचानक रस्त्यावर आला व स्वप्निलच्या दुचाकीवर हल्ला केला . या हल्ल्यात स्वप्नीलच्या पायाला मुका मार लागला असून त्याला नजीकच्या दवाखान्यात येथील स्थानिक युवक कुसाजी मेस्त्री,आकाश निकम, वल्लभ राऊळ,सोमा मेस्त्री दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.स्वप्निलच्या पायाला मुका मार लागल्याने पाय सुजला आहे. याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील गणू राऊळ यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वप्निलच्या घरी भेट घेतली व पाहणी केली. मात्र त्याला कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. दिवसाढवळ्या गव्याच्या वावरामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी गावचे सरपंच दीपक राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ यांनी केली आहे.