अंकोला तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
कारवार : बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी अंकोला तालुक्यातील वासरकुद्रीगे ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील उळगद्दे येथे घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव हुवण्णा गौडा (वय 24) असे आहे. याबाबत माहिती अशी की, खाद्याच्या शोधात मानवीवस्तीत दाखल झालेला बिबट्या गौडा यांच्या नव्या घरात लपून बसलेला होता. त्यावेळी कपडे आणायला गेलेल्या युवतीने बिबट्याला पाहिले आणि तिने आरडाओरड केली. काय झाले हे पाहण्यासाठी हुवण्णा गौडा बाहेर पडत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्ल्यात बिबट्याने हुवण्णा यांच्या दोन्ही हातांना ओरबडले. नशीब बलवत्तर म्हणून गौडा अधिक जखमी न होता बचावले. जखमी हुवण्णा यांना त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी अंकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच अंकोलाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मठपती आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन गौडा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.