उचगाव परिसरात युवावर्ग नशेच्या आहारी
परिसरातील पालकवर्गात चिंतेची लाट : पोलिसांकडून कारवाई करण्याची गरज
वार्ताहर/उचगाव
उचगाव, तुरमुरी, कोणेवाडी व शिनोळी परिसरात सध्या गांजा या नशेच्या पदार्थांमध्ये युवापिढी गुंग असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात मावा विक्री होत असून पोलीस खाते याबाबत अद्याप निक्रिय आहे. या प्रकारामुळे या परिसरातील पालकवर्गात चिंतेची लाट पसरली आहे. संपूर्ण बेळगाव तालुक्यामध्ये पाहिल्यास युवा पिढी दारूच्या नशेत झिंगताना दिसायची मात्र सध्याचे चित्र पाहिले तर हीच युवा पिढी अमली पदार्थांमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात गावागावांमधून गांजा विकणाऱ्या टोळ्या सध्या कार्यरत असून युवा पिढीला लागेल त्याप्रमाणे पुरवठा केला जातो. गांजाच्या नशेत सदर तऊण पिढी भरकटत असल्याचे दिसून येत आहे. नशेमध्ये याभागात भुरट्या चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टीच्या चैनी करण्यासाठी या भागात चोऱ्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे. याबरोबरच या परिसरातील आठवी, नववी तसेच दहावीच्या वर्गात शिकणारे चौदा-पंधरा वर्षांचे विद्यार्थी सुद्धा गांजामध्ये बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. हे लहान विद्यार्थी स्वत:च्या घरातून चोऱ्या करत असल्याचेही प्रकार उघडकीला येत आहेत.
गांजा विकणाऱ्या टोळ्या कार्यरत
या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गांजा विकणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. यासाठी काकती पोलीस स्टेशन आणि वडगाव पोलीस स्टेशन यांनी गांजा विकणाऱ्या टोळ्यांचा तपास करावा आणि त्यांना तातडीने गजाआड करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी आणि पालक वर्गातून करण्यात येत आहे.