Sangli Crime | सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट बेणापूरच्या तरुणाला पडली महाग! हॉस्पिटलमध्ये घुसून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी!
सोशल मीडिया पोस्टवरून तरुणाला जातीवाचक शिवीगाळ;
विटा : सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या कारणावरून तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भिवघाट येथील एका हॉस्पिटलमध्ये घडली.
याबाबतविकास अनिल कांबळे (वय ३२, रा. बेणापूर, ता. खानापूर) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलिसांनी सचिन बिरा मोटे (रा. विभुतवाडी) आणि अक्षय अर्जुन (रा. अर्जुनवाडी, ता. आटपाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी विकास कांबळे हे भिवघाट येथील हॉस्पिटलमध्येअसताना संशयित तिथे आले. त्यांनी फिर्यादीला 'तू आमच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट का करतोस?', असा जाब विचारला. आमचे भांडण आम्ही मिटवून घेऊ, तू मध्ये वळवळ करू नकोस, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, पुन्हा पोरट टाकल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली, असे कांबळे यांनी फिर्यादीत म्हंटल्याचे पोलिसांनी सांगितले.