कौलगेच्या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून
दोघा संशयितांना अटक
हमीदवाडा परिसरात खळबळ
मुरगूड
कागल तालुक्यातील कौलगे येथे चुलत बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरून मित्राच्या मदतीने गल्लीतीलच एकाने 30 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घूण खून केला. स्वप्निल उर्फ पांडुरंग अशोक पाटील (वय 30 वर्ष) रा. कौलगे, ता. कागल असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एलसीबीच्या मदतीने चार तासाच्या आत या खून प्रकरणातील दोघा संशयीताना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आशुतोष चंद्रकांत पाटील वय 25 रा. कौलगे आणि सागर संभाजी चव्हाण वय 30 रा. नानीबाई चिखली ता. कागल अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही रात्री उशिरा अटक केली असून आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत स्वप्निल चे वडील अशोक पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, मयत तरुण स्वप्निल पाटील आणि आरोपी आशुतोष पाटील हे दोघे एकाच गल्लीमध्ये राहतात. काही महिन्यापूर्वी मयत स्वप्निलने आशुतोषच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. याचा राग त्याच्या मनात होता. मात्र ते प्रकरण स्थानिक पातळीवर मिटवण्यात आले होते. यानंतर दोघांमध्ये पूर्वीपासूनची मैत्री असल्याने दोघे खडकेवाडा हद्दीमध्ये असण्राया वनीकरणामध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. दि. 15 जानेवारी रोजी रात्री 10 नंतर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे आरोपींनी मयत स्वप्निल याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यानंतर मोटरसायकल मधील पेट्रोल काढून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून आरोपी तिथून पसार झाले.
स्वप्नील पाटील हा दोन दिवसांपूर्वी म्हणजे दि.15 रोजी एमआयडीसीत कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतला नाही.
आज सकाळी गावापासून 3 कि. मी. अंतरावर सुरू होण्राया खडकेवाडा हद्दीमध्ये वनीकरणाच्या गट नं. 56 मध्ये स्वप्नीलचा मृतदेह आढळून आला. खून झाल्यानंतर त्या मागची कारणे आणि आरोपी शोधण्यासाठी तपास पथकातील पोलीस अंमलदार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मयत स्वप्निल पाटील व त्याचे गावातील आरोपी आशितोष पाटील व आणखीन एकजण दि. 15 रोजी रात्री एकत्र होते व त्यानंतरच मयत स्वप्निल पाटील हा घरी आलेला नाही. अशा माहितीचे आधारे आशुतोषला राहत्या घरातून ताब्यात घेवून सखोल तपास केला असता त्याने गुन्हा केलेचे कबूल केले. तसेच खून करताना त्याचेसोबत सागर चव्हाणही सोबत असल्याची माहिती दिली. सागरला चिखलीतून ताब्यात घेतले.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग सुजितकुमार क्षिरसागर यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच मुरगुडचे एपीआय शिवाजी करे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाचा अवघ्या चार तासात तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार रोहित मर्दाने, विजय इंगळे, युवराज पाटील, बालाजी पाटील राजु कांबळे, समीर कांबळे, यशवंत कुंभार, नामदेव यादव व महादेव कु-हाडे यांनी कामगिरी बजावली. मृतदेह सापडल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
खडकेवाडा वनीकरण जागा ठरत आहे ओपन बार!
खडकेवाडा हद्दीत असण्राया सामाजिक वनीकरणाची विस्तीर्ण जागा निर्जन असल्याने येथे अवैध प्रकार चालतात. दारू, गांजा प्राशन करण्यासाठी व्यसनी लोक या जागेचा सर्रास वापर करतात म्हणून ही जागा ओपन बार म्हणून ओळखली जाते. दोन दिवस होऊनही अनेक तास उलटले तरी खुनाचा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही.