मच्छेत तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
गणेश विसर्जन करायला गेला असता दुर्घटना
त. भा. प्रतिनिधी /बेळगाव
घरगुती गणपतीचे विसर्जन करताना तलावात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी मच्छे येथे घडलेल्या या घटनेने गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

विश्वेश विनोद नायक (वय 20) मूळचा राहणार हणकोण, जि. कारवार, सध्या राहणार नेहरुनगर-मच्छे असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शुक्रवार दि. 25 सप्टेंबर रोजी मच्छे येथील तलावात आपल्या शेजाऱ्यांच्या गणपतीचे विसर्जन करताना ही घटना घडली आहे.
घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी विश्वेश तलावाच्या मध्यभागापर्यंत पोहत पोहोचला होता. त्यानंतर बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शुभम हुली, मायकल पिंटो, जगदीश गस्ती, राजू टक्केकर आदींनी तलावात विश्वेशसाठी शोधमोहीम सुरू केली.
केवळ अर्ध्या तासात त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनास्थळी एसडीआरएफचे पथक व बेळगाव ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने संयुक्तपणे मोहीम राबवून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.