फुटबॉल खेळताना तरुणाचा मृत्यू
कळंबा टर्फवरील घटना
कोल्हापूर
रविवार सुट्टीनिमीत्त टर्फवर फुटबॉल खेळत असताना धाप लागल्याने बँक वसुली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कळंबा परिसरातील टर्फवर ही घटना घडली. महेश धर्मराज कांबळे (वय 30, रा. निर्माण चौक, संभाजीनगर) असे मृताचे नांव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश कांबळे हा एका खासगी बॅंकेत वसुली प्रतिनिधी म्हणून काम करत होता. रविवारी सुट्टी असल्याने तो मित्रांसोबत कळंबा परिसरातील टर्फ मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. रविवारी दुपारी खेळत असताना त्याला धाप लागली. यामुळे खेळणे थांबवून तो बाहेर आला व काही काळ विश्रांती घेतली. काही वेळातच त्याला चक्कर आल्याने मित्रांनी त्याला कळंबा रिंगरोडवरील दवाखान्यात दाखल केले. त्याची प्रकृती ठिक वाटल्याने महेश घरी निघून गेला. काही वेळातच महेशला पुन्हा अचानक चक्कर आली व त्याला अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी त्याला पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. महेशच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. महेशच्या मृत्यूची माहिती मिळताच मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.