Kolhapur News : शिरोलीत फॅब्रिकेशन करताना विजेच्या धक्क्याने तरुण ठार
नागाव, माळवाडी येथे विजेच्या धक्क्यामुळे अपघात
पुलाची शिरोली : फॅब्रिकेशनचे कामकरताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला. सागर शिवानंद बावकर (वय ३८, सद्या रा. कासेगाव, जि. सांगली, मूळ रा. रामतीर्थ गल्ली, हलशी ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. नागाव, ता. हातकणंगले येथील बाळूमामा कॉलनी, माळवाडी येथे शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. नागाव येथील बाळूमामा कॉलनी येथे तानाजी पुजारी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
सागर शुक्रवारी सकाळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून टेरेसवर जाण्यासाठी जिना बसविण्याचे काम सुरू होते. लोखंडी शिडी लावत असताना इमारतीच्या वरून गेलेल्या सर्व्हिस वायरला शिडीचा स्पर्श झाला. त्यामुळे सागरला विजेचा धक्का बसला. यामध्ये सागर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. तो जागीच मयत झाला. घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठविला. नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.