सावईवेरे येथे तळीत बुडून तरुणाचा मृत्यू
दुर्दैवी मृत्यू आल्याने गावात हळहळ
वार्ताहर/ सावईवेरे
सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानच्या तळीत आंघोळ करताना तुळशीदास दत्ता पालकर (42 वर्षे रा. वेलकास सावईवेरे) या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. काल बुधवार दि. 25 रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास ही घटना घडली. पाण्यात पोहत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, असा प्राथमिक अंदाज आहे.
तुळशीदास हा आपल्या दोघां मुलांसोबत अनंत देवस्थानच्या तळीत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला उत्तमपणे पोहता येत होते. दोन्ही मुलांकडून ट्युबवर पोहण्याचा सराव करून घेताना अचानकपणे तो पाण्यात बुडाला. वडील पाण्यात बुडाल्याचे पाहून मुलांनी आरडाओरडा केल्याने जवळपास असलेले लोक घटनास्थळी मदतीसाठी धावले. त्याला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. म्हार्दोळ पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक झाकीर हुसेन यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवला आहे. शवचिकित्सेनंतर त्याच्या मृत्युमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मयत तुळशीदास पालकर हा कुंडई येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. शांत व सुस्वभावी असलेल्या तुळशीदासच्या अकाली मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, इयत्ता तिसरीत शिकणारी मुलगी व पहिलीत शिकणारा मुलगा अशी दोन लहान मुले तसेच वडील, भाऊ असा परिवार आहे.