For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेणकुरे येथे होळी अंगावर पडल्याने युवकाचा मृत्यू

02:44 PM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेणकुरे येथे होळी अंगावर पडल्याने युवकाचा मृत्यू
Advertisement

गावावर पसरली शोककळा : आमदार, मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

Advertisement

डिचोली : गावामध्ये देवदेवतांसमोर होळीच्या रात्री मोठ्या उत्साहाने रोवण्यात येणारी लांबलचक होळीच अंगावर पडून त्याचा मृत्यू होण्याची दुर्दैवी, हृदयद्रावक घटना डिचोली तालुक्यातील मेणकुरे गावात घडली आहे. मेणकुरे गावातील चव्हाटा येथे गावातील प्रमुख होळी रोवत असताना ती छिद्रातून जराशी सरकली व थेट जमिनीवर पडली. जमिनीवर पडत असतानाच त्याखाली दुर्दैवाने सापडलेल्या मेणकुरे येथीलच प्रणव पांडुरंग मिशाळ या 42 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मेणकुरे गावावर परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.

ही घटना होळी पौर्णिमेच्या रात्री म्हणजे सोम. दि. 2 मार्च रोजी रात्री 10 वा. च्या सुमारास घडली. जंगलातून मोठ्या आंब्याच्या झाडाची लांबलचक होळी कापून वाजत गाजत गावात आणल्यानंतर चव्हाटा येथे गावाची पहिली होळी रोवण्याची परंपरा आहे. या परंपरेत गावातील लहान-मोठे परंपरेप्रमाणे सहभागी होतात व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ती रोवली जाते. होळी रोवण्याचे काम सुरू असतानाच ती जराशी सरकली आणि नेमात न गेली नाही. होळी जमिनीवर कोसळत असताना त्याखाली असलेल्या लोकांनी लांब धाव घेतली. परंतु प्रणव मिशाळ हे या होळीच्या खालून मागे हटण्यास अपयशी ठरले व तेथेच खाली पडले, त्यांच्यावर होळी पडली.

Advertisement

रक्तबंबाळ झालेल्या प्रणव याला बाहेर काढले. त्याला सर्वप्रथम म्हापसा येथील आसिलो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. आझिलोत प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी बांबोळी येथे भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असतानाच काल मंगळ दि. 3 मार्च रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास प्रणव मिशाळ यांचे निधन झाले. यांच्या निधनाची वार्ता मेणकुरे गावात पसरताच गावावर शोककळा पसरली.

रात्री प्रणव मिशाळ यांच्यावर होळी कोसळून त्यांना इस्पितळात नेल्यानंतर गावातील इतर लोकांनी सदर होळी परंपरेप्रमाणे छिद्रात घालून उभी केली व तिची विधीवतपणे पूजा करण्यात आली. मात्र या घटनेमुळे गावातील उत्साहावर विरजण पडले. प्रणव मिसाळ हे एक मनमिळावू असे व्यक्ती होते ते भारतीय राखीव दल पोलिस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अशा होळी सणाच्या दिवशी अकाली निधनामुळे गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे. संध्याकाळी त्यांचे पार्थिव मेणकुरे येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असता मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावून त्यांचे अंतिमदर्शन घेतले. त्याच संध्याकाळी त्यांच्यावर अंतिमसंस्कारही करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो हेही उपस्थित होते.

मेणकुरेतील घटना ह्रदयद्रावक : डॉ. शेट्यो

होळीच्या दिवशी होळी रोवतानाच ती पडून अशाप्रकारची घटना ही पहिल्याचवेळी समोर आली आहे. या घटनेमुळे एकाचा जीव जाणे हे अत्यंत दुर्दैवी असून मनाला अत्यंत दु:ख झाले आहे. उत्सवाच्या वेळी व पारंपरिक विधी पार पाडताना अशा घटना घडणे चुकीचे आहे. प्रणव हा युवक मनमिळाऊ व धडपडी युवक होता. त्याच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

मेणकुरे डिचोली येथे होळी रोवताना सदर होळी पडल्याने गावातील प्रणव मिशाळ यांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दु:ख व्यक्त केले आहे. होळी व शिमगोत्सव हा गोव्यातील आनंदाचा व उत्साहाचा सण आहे. अशा सणावेळी अशी दुर्दैवी घटना घडणे दु:खदायक आहे. गोव्यातील अनेक ठिकाणी शिमगोत्सवात विविध अनोखे व अदभूत परंपरा प्रथा आहेत. आपली ही परंपरा व संस्कृती सांभाळत असतानाच सर्वांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.