For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सारमानस येथे कारसह युवकाला जलसमाधी

10:04 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
सारमानस येथे कारसह युवकाला जलसमाधी
Advertisement

धबधबा डिचोली येथील युवकाचा मृत्यू : युवकाला आला ह्रदयविकाराचा झटका,महिलेने मुलासह स्वत:ला वाचविले

Advertisement

डिचोली : सारमानस पिळगाव येथील फेरीधक्क्यावर व्हॅगन आर कार थेट पाण्यात गेल्याने चारचालक युवकाला कारसह जलसमाधी मिळाली. या घटनेत कारमध्ये असलेल्या महिलेने आपल्या मुलासह कारमधून उडी मारल्याने त्यांचे प्राण सुदैवाने वाचले. मृत्यू झालेला कारचालक यतीन महादेव मयेकर (वय 29, राहणार धबधबा डिचोली) याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा दुर्दैवी प्रकार घडला, असा प्राथमिक अंदाज आहे. ही दुर्दैवी घटना काल मंगळवारी संध्या. 6.30 वा. च्या सुमारास घडली. यतीन मयेकर हा युवक व्हॅगन आर कारमधून (जीए 06 डी 9472) मुंबईतील पर्यटकांचे भाडे घेऊन करमळी रेल्वे स्टेशनवर निघाला होता. मुंबईतील एक जोडपे व त्यांचा मुलगा होता.

 अशी घडली दुर्दैवी घटना...

Advertisement

सारमानस येथे कार दाखल झाली, त्यावेळी फेरीधक्क्यावर चारचाकींची गर्दी होती. करमळी रेल्वे स्थानकावर लवकर पोहोचणे गरजेचे होते. अन्यथा रेल्वे चुकणार या घाईने कारमधील मुंबईतील पर्यटक नागरिक खाली उतरला. त्याने पुढे रांगेत उभ्या असलेल्या कारवाल्यांना त्यांची गाडी पुढे सोडण्याची विनंती करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी कारचालक यतीन सीटवरच कोसळला. गाडी धक्क्यावरुन पाण्याच्या दिशेने धावू लागली. गाडीतील महिलेने प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा तत्काळ उघडला आणि मुलासह बाहेर उडी घेतली. अन् क्षणातच कार थेट पाण्यात गेली.

 स्थानिकांनी चालकाला काढले बाहेर

ही घटना घडताच सारमानस फेरीधक्क्यावर हाहाकार माजला. सर्वत्रच गोंधळ उडाला. याचवेळी फेरीधक्क्यावर असलेल्या निखिल वरगावकर (सारमानस), पांडुरंग कुंडईकर, लक्ष्मीकांत भामईकर, नारायण कवळेकर (सर्व राहणारे माठवाडा, पिळगाव) या स्थानिकांनी मागचा पुढचा विचार न करता थेट पाण्यात उड्या घेऊन  पाण्याखाली गेलेल्या कारमधील चालक यतीन मयेकर याला बाहेर काढले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. कारमध्ये असलेली मुंबईतील महिला नर्स असल्याने तिनेही त्याला तपासून पाहिले.

 घटनेमुळे फेरीसेवा ठप्प

या घटनेमुळे सारमानस ते सांत इस्तेव्ह ही फेरीसेवा पूर्णपणे ठप्प झाली. फेरीधक्क्याखालीच कार असल्याने फेरी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या जलमार्गावरील लोकांचेही हाल झाले. रात्री 8 वा. च्या सुमारास पाण्यात गेलेली व्हॅगनआर कार पाण्याबाहेर काढण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी गाडी बाहेर काढली.

 सारमानस फेरीधक्का धोकादायकच, यापूर्वीच्या आठवणी ताज्या

सारमानस फेरी धक्क्यावर दाखल होण्यापूर्वी लागणारी उतरण अत्यंत धोकादायक आहे. या उतरणीवर जर वाहनचालकाचा ताबा गेला तर गाडी थेट पाण्यातच जाण्याचा धोका असतो. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या घटनेने मागील काही वर्षांमध्ये या फेरीधक्क्यावर घडलेल्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या. याच फेरीधक्क्यावर एक फेरीबोट क्षमतेपेक्षा जास्त भार घातल्याने बुडाली होती. त्यावेळी हाहाकार माजला होता. फेरीतील सर्व गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या, तर माशेलातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच गाडीप्रमाणेच एक चारचाकी थेट फेरीधक्क्यावरून पाण्यात गेला होती. त्यातही एका वृध्दाचा मृत्यू झाला होता. अशा अन्यही काही घटना घडलेल्या आहेत. कालच्या या घटनेने मागील स्मृती ताज्या केल्या.

 महिलेच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक

चालकाला अस्वस्थ वाटून तो सीटवर कोसळला. गाडी पाण्याच्या दिशेने धाव घेत होती. समोर मृत्यू दिसत होता. बरोबर आपले मूल.. काय करावे ते समजत नसतानाच या मातेने केलेल्या धाडसाने दोन जीव वाचले. अशा बिकट परिस्थितीत सापडलेल्या या मातेच्या शौर्याला काल सारमानस येथे सर्वांनी कौतुकाची थाप दिली. गाडीत मुंबईतील अमित विजय कोरगावकर, यशश्री कोरगावकर, मुलगा अईन कोरगावकर (वय 12) हे तिघेजण होते.

Advertisement
Tags :

.