नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक
खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यालयाला घेरावाचा प्रयत्न : पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात
बेळगाव : नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटणे, पेट्रोल-डिझेल दरवाढ तसेच महागाईविरोधात जिल्हा युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शहरात जोरदार आंदोलन छेडले. खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यालयाला घेराव घालून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनाचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. प्रारंभी कन्नड साहित्य भवन येथून आंदोलनाला सुऊवात झाली. राणी चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. यावेळी पोलिसांनी कार्यालयाबाहेर बॅरिकेड्स उभारून आंदोलनकर्त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे नीट प्रश्नपत्रिका फुटीसारख्या गंभीर घटना घडत आहेत. वारंवार प्रश्नपत्रिका फुटूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. तसेच परीक्षा प्रक्रियेची पवित्रता राखण्यात अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
उपाययोजना करण्याऐवजी सामान्य जनतेवरच भार
पेट्रोल-डिझेल कमी वापरा, सोने खरेदी करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला देत आहेत. मात्र महागाई वाढण्याला केंद्र सरकारच जबाबदार असल्याने त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सामान्य जनतेवरच भार टाकला जात आहे. नीट परीक्षेसंदर्भात अनेकवेळा प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्या आहेत. यावरून केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नसल्याचे स्पष्ट होते. सरकार केवळ निवडणुका, खोटी आश्वासने आणि जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे, असा आरोपही करण्यात आला. यावेळी कार्तिक पाटील, अब्दुल देसाई, पवन नायक, अनिकेत पठाण, सुनील हलगी, शिवकुमार हंप्पण्णवर, अफताब कमतनूर, विष्णू कारदारी, अनीश कौजलगी, मडिवाळप्पा अक्कीसागर, प्रितम बेळगावी, दादापीर जमादार, मंजुनाथ पोतन्नवर, हरताक अली यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.