युवक काँग्रेस नेत्याला अटक, कोठडी
सदराविहीन आंदोलन सूत्रधार असल्याचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत झालेल्या जागतिक एआय परिषदेत काँग्रेसच्या काही सदस्यांकडून करण्यात आलेल्या सदराविहीन निदर्शनांचा सूत्रधार आणि युवक काँग्रेसचा नेता उदयभानू छिब याला अटक करण्यात आली आहे. त्याला दिल्लीतील न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीही दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. काँग्रेसने या अटकेचा निषेध केला.
दिल्लीतील जागतिक एआय परिषदेत काँग्रेसच्या साधारणत: दहा कार्यकर्त्यांनी प्रवेश मिळविला होता आणि या परिषदेच्या परिसरात गेल्यानंतर त्यांनी आपल्या अंगावरचे शर्ट काढून घोषणाबाजी केली होती. ही परिषद पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी या कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांच्या आधीन केले होते. या कार्यकर्त्यांना बघ्यांकडून मारहाणही करण्यात आली होती, असे या युवकांचे म्हणणे आहे.
कोठडीला विरोध
दिल्ली पोलिसांनी छिब याला अटक करून न्यायालयासमोर मंगळवारी हजर करण्यात केले. त्यानंतर त्याच्या कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र छिब याने पोलीस कोठडीला विरोध केला. हे दंगलीचे प्रकरण नाही. कार्यकर्ते शांततेने आपला विरोध दर्शवत होते. त्यांच्या हाती शस्त्रे किंवा कोणतेही साधन नव्हते. तेथे उपस्थित लोकांनी या निदर्शकांनाच मारहाण केली होती. ज्यावेळी ही निदर्शने झाली, तेव्हा छिब तेथे उपस्थित नव्हता. हा केवळ विरोध दर्शविण्याचा मार्ग होता, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. न्यायालयाने तो मानण्यास नकार दिला आणि छिब याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवणी केली आहे.
आरोपीकडून सूत्रसंचालन
आरोपी छिब हा जरी घटनास्थळी उपस्थित नसला, तरी तो निदर्शकांना दूरध्वनीवरून मार्गदर्शन करत होता. या निदर्शनांची योजना त्याचीच होती. तो दूर राहून ही निदर्शने आणि अन्य घडामोडींवर लक्ष ठेवून होता. हे आंदोलन वाटते तितके साधे नव्हते. दंगली घडविण्याचाच या कार्यकर्त्यांचा हेतू होता. त्यांच्या हेतूची चौकशी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी त्यांची कोठडी पोलिसांना हवी आहे, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी केला होता.
कारस्थानाचा शोध
या निदर्शनांच्या पाठीशी कोण आहे आणि हा कोणत्या व्यापक कारस्थानाचा भाग आहे काय, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या आंदोलनाला आर्थिक पाठबळ कोणी दिले याचाही शोध घेतला जात आहे. तसेच, या युवकांनी जे टीशर्टस् घातले होते, त्यांच्यावर कोणत्या घोषणा मुद्रीत केलेल्या आहेत, याचाही शोध पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या कार्यकर्त्यांकडून काही टीशर्टस् जप्त करण्यात आली असून त्यांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती दिली गेली.
कोणते आरोप...
अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे कटकारस्थान करणे, सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, लोकसेवकांच्या कामांमध्ये अडथळा आणणे, लोकसेवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या आदेशांचा भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे आणि कारस्थान करण्याचा सामायिक हेतू बाळगणे, असे अनेक आरोप अटक केलेल्यांवर पोलिसांकडून लावण्यात आले.
आतापर्यंत आठ जणांना अटक
पोलिसांनी आतापर्यंत भारतीय युवक काँग्रेसच्या आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्यापैकी काही जणांची नावे अजय कुमार, राज गुज्जर, जितेंद्र यादव, रितीक शुक्ला आणि उदयभानू छिब अशी आहेत. या सर्व आरोपींवर गुन्हेगारी कायद्यांच्या अनुच्छेदांप्रमाणे अनुच्छेद 196 आणि 197 लागू करण्यात आले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा शक्य आहे.