सिलिंडर दरवाढ-महागाईविरोधात युवा काँग्रेसचा केंद्राविरोधात मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बेळगाव : गॅस सिलिंडरची दरवाढ व महागाईच्या विरोधात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बेळगाव येथे निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. केंद्राने त्वरित गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी युवानेते राहुल जारकीहोळी यांनी केली. जिल्हा युवा काँग्रेसच्यावतीने राज्य युवा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी काँग्रेस भवनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाने येऊन निदर्शने करण्यात आली. मोर्चात केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, ग्रामीण युवा विभागाचे जिल्हाध्यक्ष कार्तिक पाटील, एआयसीसीचे सचिव गोपिनाथ पलनीअप्पन, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप एम. जे., केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, चिकोडी जिल्हा एसटी विभागाचे अध्यक्ष अनिकेत पट्टण, परशुराम ढगे, महांतेश मगदूम यांच्यासह काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवाढीमुळे गरीब व मध्यमवर्गीयांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याची मागणी राहुल जारकीहोळी यांनी केली. तर आमदार राजू सेठ यांनी केंद्र सरकारने सर्वसामान्यांवर दरवाढ थोपली आहे. केंद्राची हे जनविरोधी धोरण आहे.