For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रंगोत्सवाला तरुणाईचा जल्लोष

01:19 PM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
रंगोत्सवाला तरुणाईचा जल्लोष
Advertisement

धुळवडीनिमित्त रंगांची उधळण : आकर्षक वेशभूषेने वेधले लक्ष : ग्रहणामुळे उत्साहाला मर्यादा

Advertisement

बेळगाव : शहर परिसरात धुळवडीनिमित्त रंगांची उधळण झाली. नेहमीप्रमाणे तरुणाईने रंगांचा आनंद लुटला. यासाठी गल्लोगल्ली सोमवारीच पाण्याचे फवारे उभारण्याची तयारी करण्यात आली होती. स्प्रिंक्लरच्या फवाऱ्यांवर रंगांची उधळण करत बेभान होऊन नाचणारी तरुणाई, हे चित्र शहरासह उपनगरात पहायला मिळाले. सोमवारी रात्री उशिरा पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आले. मंगळवारी सकाळपासून रंगोत्सवाची धमाल पहायला मिळाली. गल्लोगल्ली पाण्याचे स्प्रिंक्लर बसविण्यात आले असल्याने पाण्याच्या फवाऱ्यांवर रंगांची उधळण करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण व तरुणी दाखल झाली होती.

एकमेकांना रंग लावत धुळवडीचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. कचेरी रोड परिसरात एकाच रंगाचे कपडे घातलेले तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शहरातील चव्हाट गल्ली, खडक गल्ली, कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली, गणाचारी गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, कामत गल्ली, पांगुळ गल्ली, भांदुर गल्ली, मुजावर गल्ली या शहरातील मध्यवर्ती भागात रंगांची उधळण सुरु होती. याच बरोबर टिळकवाडी, अनगोळ, कॅम्प, नेहरुनगर, रामतीर्थ नगर, शिवाजी नगर या भागातही उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई बेभान होऊन थिरकत होती.

Advertisement

पांगुळ गल्ली येथे लोटांगण

पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिर परिसरात दरवर्षी लोटांगण घातले जाते. मनातील इच्छा देवाजवळ व्यक्त करण्यासाठी मंदिराच्या परिसरात लोटांगण घातले जाते. यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळे सकाळच्या सत्रात लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला. लोटांगण घालणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम झाला. लोटांगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

रिल्स आणि स्टेट्सचा मारा

सध्या प्रत्येकाकडेच महागडे फोन असल्यामुळे रंगोत्सवाच्या आनंदाचे चित्र टिपण्यासाठी धडपड सुरु होती. आपले फोटो अथवा व्हिडीओला अधिक लाईक्स मिळावेत यासाठी रंगांच्या उधळणीतच एडिटिंगही सुरु होते. त्यामुळे होळी व धुळवडीच्या शुभेच्छांसह रिल्स आणि स्टेट्सचा सोशल मीडियावर भडीमार पहायला मिळाला. रंगांमध्ये चिंब भिजलेले फोटो व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर दिसून आले.

बाजारपेठेत शुकशुकाट

रंगोत्सव आणि मंगळवार असल्याने बाजारात शुकशुकाट दिसून आला. दुपारपर्यंत रंगांची उधळण करणारी तरुणाई शहरात दिसून आली. पण त्यानंतर रस्ते पूर्णपणे रिकामी झाले होते. बाजारात खरेदीदारच नसल्याने दुकानेही उघडण्यात आली नाहीत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. यामुळे परगावाहून आलेल्या नागरिकांना हॉटेल्स व दुकाने बंद असल्याने त्रास सहन करावा लागला.

आनंदाला ग्रहण

यंदा धुळवडीनिमित्त रंग खेळण्यात आला खरा परंतु या आनंदाला ग्रहण लागले.मंगळवारी आलेल्या चंद्रग्रहणामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे जल्लोष, उत्साह, आनंदाला उधाण असे नेहमी दिसणारे चित्र पहायला मिळाले नाही. ग्रहणाचा पर्वकाळ सायंकाळी संपला. त्यानंतर रंग खेळणे अशक्य होते. शिवाय सामिष आहारही बऱ्याच ठिकाणी वर्ज्य मानण्यात आला. याची कसर आता बुधवारी भरुन निघणार आहे. अनेक क्लब तसेच हॉटेलमध्ये बुधवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम सशुल्क असले तरी हौसेला मोल नाही म्हणत तरुणाई तेथे गर्दी करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Tags :

.