Solapur Crime | पंढरपूर येथे युवकाची निर्घूण हत्या
युवकाचा खून करुन मृतदेह रेल्वे रुळावर
पंढरपूर : पंढरपूर शहरात धक्कादायक आणि शहारे आणणारी खुनाची घटना घडली. एक युवकाला मारहाण करून खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर ठेवण्यात आला. शिवाय त्याचा एक पाय कापून त्याच्या घराच्या दरवाजावर टांगण्यात आला.
या हत्येने शहर व परिसरात दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुनाची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रोहित मधुकर कोरे (वय २४, रा. अनिलनगर झोपडपट्टी) असे मृताचे नाव आहे. त्याचा काही युवकांशी सोमवारी रात्री वाद झाला होता. हे भांडण दोन महिन्यांपासून सुरू होते.
त्यावेळी काही युवकांनी त्याला ठार मारण्याची धमकीदेखील दिली होती. यावर रोहितने घरच्या लोकांना भांडणे वाढण्याची शक्यता बोलून दाखवली होती. पुन्हा सोमवारी रात्री साडेअकरा वाजता काही युवक भांडणे मिटवायची आहेत, असे सांगत त्याला घरातून घेऊन गेले आणि रोहितला दारू पाजली.
रोहितला नदीजवळ रेल्वे पुलावर नेऊन मारहाण करुन ठार मारण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला. एवढ्यावर न थांबता मारेकऱ्यांनी रोहितचा उजवा पाय कापून चक्क त्याच्या मावशीच्या घराच्या दारावर टांगला होता. या हत्याकांडाने पंढरी हादरून गेली.
दरम्यान, रोहितची आई आणि नातेवाईकांनी हत्येतील गुन्हेगारांना पकडत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत, असे बजावले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे तपास करीत आहेत.
अनिलनगर अवैध व्यवसायाचा भाग
अनिलनगर परिसर हा गुन्हेगारी व अवैध व्यवसायाचा अड्डा बनला आहे. या परिसरात दररोज भांडणे, हाणामारीच्या घटना घडतात. काही महिन्यांपूर्वी एका कुरिअर सेवकाचा आणि त्याच्या आईचा घरात घुसून कोयत्याने वार करून निर्घूण खून करण्यात आला होता. या घटनेतील संशयित आरोपी सहा महिन्यांनी इंस्टाग्रामवर करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे सापडले होते.