Kolhapur News : पेठवडगावात निवडणूक वादातून युवकावर एडक्याने हल्ला; दोघांना अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी
पेठवडगाव बाजारपेठेत युवकावर एडक्याने हल्ला
पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादातून भर बाजारपेठेत एका युवकावर एडक्याने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात २५ वर्षीय रतन आप्पासो पाटोळे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पेठ वडगावातील साळी गल्ली येथे राहणारा रतन पाटोळे यांचा बाजारपेठेत हार विक्रीचा व्यवसाय आहे.नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत रतन पाटोळे व त्याचा शेजारी राहणारा सागर राजेंद्र खोत यांच्या प्रभागातील उमेदवार निवडून आला होता.या विजयानंतर फटाके उडवण्यात आल्याचा संशय सागर खोत याने रतन पाटोळे याच्यावर घेतला होता.याच कारणातून यापूर्वीही सागर खोत याने रतन पाटोळे याला मारहाण केली होती.याबाबत रतन पाटोळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सागर खोत हा हद्दपार गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बुधवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सागर राजेंद्र खोत व त्याचा मित्र आयुब मेहबूब सरकावस यांनी भर बाजारपेठेत रतन पाटोळे याच्यावर एडक्याने हल्ला चढवला.या हल्ल्यात रतन पाटोळे यांच्या डोक्यावर,तोंडावर व पाठीवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.जखमी रतन पाटोळे याला तात्काळ पेठ वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
.या प्रकरणी रात्री उशिरा उज्वला आप्पासो पाटोळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.दरम्यान,संशयित आयुब सरकावस याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एडक्याला धार लावत असल्याचा फोटो स्टेटस ठेवला असून तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीसांनी दोन्ही संशयितांना रात्री उशिरा अटक केली असून त्यांना आज पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेमुळे पेठ वडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.