प्रेम प्रकरणातून सशस्त्र हल्ल्याच्या तयारीतील युवक गजाआड
कराड :
प्रेम प्रकरणातून युवतीवर कोयत्याने हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका संशयित युवकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.
प्रेम प्रकरणातून एका युवतीवर एक युवक प्राणघातक हल्ला करणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार मोहसीन मोमीन, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांना मिळाली होती. या माहितीनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दिग्विजय सांडगे, मोहसीन मोमीन आणि सोनाली पिसाळ यांनी संबंधित युवतीला ज्या परिसरात भेटण्यास युवक येणार होता, त्या परिसरात सापळा लावला होता. या सापळ्यात संशयित युवक अलगदपणे अडकला. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार कोयता मिळून आला. प्रेम प्रकरणात मतभेद झाल्याने चिडून जाऊन संशयित युवक संबंधित युवतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याने रात्री आठच्या सुमारास त्यास ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याचबरोबर संबंधित युवतीकडून या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्याची कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू होती.