विट्यात पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की : तरूणास अटक
विटा :
येथील मायक्का नगरमध्ये रस्त्यावर उभा राहून आरडाओरडा करणाऱ्या तरूणाला हटकणाऱ्या पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की, शिवीगाळ करत तुम्हाला ठेवणार नाही, नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार विटा पोलिसात दाखल झाली आहे.
ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. अक्षय सुनील धुमाळ (वय २१, मायाक्कानगर, विटा) असे धक्काबुक्की करणाऱ्या संशयित तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिस धोंडीबा बबन वागतकर यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, धोंडीबा वागतकर हे हायवे पेट्रोलिंग विभागात चालक म्हणून काम करत आहेत. ते काल रात्री हायवे पेट्रोलिंग चारचाकी (एम. एच. १०. एन. २५४९) मधून पेट्रोलिंग करीत मायाक्कानगर येथे गेले असता संशयित धुमाळ हा रस्त्यावर उभा राहून आरडाओरडा करीत होता.
त्यामुळे धोंडीबा वागतकर यांनी त्यास रस्त्याच्या बाजूला हो, असे सांगत असताना त्याने 'तुमचा काय संबंध नाही, तुम्ही मला काय सांगायचे नाही' असे म्हणून गाडीवर जोरजोरात हाताने मारण्यास सुरूवात केली. धुमाळ त्यावेळी वागतकर हे त्यास समजावून सांगत असताना त्यांच्या अंगावर धावून गेला.
संशयिताने धोंडीबा वागतकर यांची कॉलर धरून हाताने धक्काबुक्की करून अंगाशी झोंबाझोंबी केली. अन्य पोलिस कर्मचारी सुतार हे धुमाळ यास आमच्या अंगाजवळ येवू नको, असे सांगत असताना त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करून, मला घेवून गेला तर तुम्हाला ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
वागतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत धुमाळा याने शासकीय कामामध्ये अडथळा आणला, असे म्हटले आहे. याप्रकरणी संशयित धुमाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले