स्वतःमधील पत्रकार मरू देऊ नका ; तुमची पत्रकारिता समाज घडवणारी असावी
संपादक शेखर सामंत यांचे मार्गदर्शन ; पत्रकारिता अभ्यासक्रमाचा श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रात शुभारंभ
सावंतवाडी
करिअर किंवा पॅशन म्हणून पत्रकारितेत यायचं असेल तर जरूर या. पण, केवळ पैसा कमवायचाय एवढंच ध्येय ठेवू नका. आपण चौथा स्तंभ आहोत या जबाबदारीने काम करा, स्वतःमधील पत्रकार मरू देऊ नका, ग्रुप जर्नालिझम टाळून प्रत्येक पत्रकाराने चिकित्सक पत्रकारितेला महत्त्व द्यायला हवे असे प्रतिपादन तरूण भारत संवादचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक संपादक शेखर सामंत यांनी आज येथे केले . सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रावरील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी करण्यात आला . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, आपली लेखणी ही एखाद्याचे आयुष्य घडवू शकते अथवा बरबाद करू शकते. त्यामुळे जबाबदारीने लेखन करायला हवे . पत्रकारितेत असताना पत्रकाराने पाय जमिनीवर राहतील याची काळजी घ्यावी. पत्रकाराकडे प्रामाणिकपणा असावा, त्याच्यातील स्वाभिमान जागृत असला पाहिजे. तसेच पत्रकाराने संवेदनशील असणे आवश्यक आहे. आपली पत्रकारिता ही संदेश देणारी हवी, समाज घडवणारी असावी. या क्षेत्रात खूप मोठी ताकद आहे असे मत श्री. सामंत यांना व्यक्त केले.
यावेळी श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, अमोल टेंबकर, हरिश्चंद्र पवार, डॉ. जी.ए.बुवा, प्रा. रूपेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात गजानन नाईक यांनी पत्रकार म्हणजे काय ? पत्रकारितेचा जन्म कसा झाला याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुकांना पत्रकारिता पदविका कोर्सचे लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी तरूण भारत संवादचे संपादक शेखर सामंत, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सहकार्याध्यक्ष डॉ. जी.ए. बुवा, अ.भा. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, केंद्र संयोजक राजेश मोंडकर, सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर, वाय.पी.नाईक, रवी जाधव, पत्रकार दीपक गांवकर, प्रा. रूपेश पाटील, अनिल भिसे, विनायक गांवस, भुवन नाईक, अनुजा कुडतरकर, संदीप चव्हाण, प्रसाद माधव, साबाजी परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मोंडकर, सुत्रसंचालन मंगल नाईक-जोशी यांनी तर आभार विद्या सामंत यांनी मानले .