For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोटी कोटी किरण तुझे...

06:37 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोटी कोटी किरण तुझे
Advertisement

तरुण भारतचे समूह प्रमुख, सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण होत असून आज 74 वा वाढदिवस सांगलीत उत्साहात साजरा होत आहे. दैनिक तरुण भारतच्या यशदायी वाटचालीत, लोकमान्य सोसायटीच्या विस्तारात व शैक्षणिक योगदानात डॉ. किरण ठाकुर यांचा वाटा सिंहाचा राहिला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा.

Advertisement

काही माणसे उरात स्वप्न बाळगूनच जन्माला येतात आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी स्वत:चे सारे जीवन त्यासाठी झोकून देतात आणि त्यांचे यश हे त्यांच्या कष्टाचे सार असते. त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्यातून स्पष्ट होतं की तुम्ही काम करत राहा आणि कष्ट कराल तर कधीही फसणार नाही. एखाद्या व्यवसायात उतरणार म्हटल्यावर तेथे आपल्याला ठोकर बसणार हे गृहित धरून पुढे जायचे. सामाजिक क्षेत्रात उतरणार तर तुम्ही जेवढे चांगले काम कराल तेवढेच तुमचे पाय ओढणारे देखील मोठ्या प्रमाणात असतील आणि पत्रकारितेमध्ये उतरणार असाल तर अनेक संकटांना सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवा. सकारात्मक पावले टाकाल तर निश्चित यश तुमच्या पाठीशी हात धुवून लागेल. विविध क्षेत्रात वावरल्यानंतर यश अपयशाचा कधीही विचार न करता डॉ. किरण ठाकुर पुढे सरसावले.  आज केवळ गोव्यातच नव्हे तर बेळगाव, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई एवढेच नव्हे तर दिल्लीतही डॉ. किरण ठाकुर उर्फ मामा यांचे सर्वत्र नाव पोहोचलेले आहे. डॉ. किरण ठाकुर ही केवळ व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे, ती एक प्रेरणा आहे, ते एक सूर्यकिरण आहेत. सूर्यकिरणात दाहकता असते परंतु ते संजीवक देखील आहे. डॉ. किरण ठाकुर या व्यक्तिमत्त्वामध्ये सूर्यकिरण आहे, संजीवक आहे परंतु दाहकता नाही. चंद्राच्या पिठोरी चांदण्याप्रमाणे ते सर्वांना भावणारे किरण आहे, त्यामध्ये शितलता आहे, प्रेमळपणा आहे, आपुलकी आहे. अनेक वर्षे त्यांच्या सहवासात असल्यामुळे मामांचे गुण समजलेले आहेत. सर्वांना आपुलकीने, प्रेमाने आणि आदराने वागविणारे डॉ. किरण ठाकुर हे आपल्या कर्मचारी वर्गाकडे देखील कधी मालक आणि कर्मचारी असा भेदभाव करत नाहीत. उलटपक्षी ते आपल्या कर्मचारी वर्गाला मित्र म्हणतात. ‘दैनिक तरुण भारत’ वृत्तपत्र आज सर्व ठिकाणी लोकप्रिय ठरतेय आणि सर्वांपेक्षा जास्त दरात ते खपले जातेय. या पाठीमागचं गणित हे इतर वृत्तपत्रांच्या मालकांना देखील कळले नाही परंतु ‘दैनिक तरुण भारत’ या वृत्तपत्राचा 107 वर्षांचा कालखंड पाहता आपले वडील कै. बाबुराव ठाकुर यांच्या निधनानंतर ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ यानुसार मामांनी हे वृत्तपत्र हाती घेतले. सर्वात पहिल्यांदा त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले ते म्हणजे, हे वृत्तपत्र केवळ माझे नाही हे वृत्तपत्र तुम्हा सर्वांचे आहे आता तुम्ही म्हणजे कोण तर तुम्ही म्हणजे जे कोणी वाचक असतील ते देखील दैनिक तरुण भारतचे एक घटक आहेत, असे समजा. त्या अनुषंगाने हे वृत्तपत्र प्रत्येकाच्या आपुलकीचे, जिव्हाळ्याचे वृत्तपत्र करा, हाच एक मंत्र घेऊन ते पुढे आले. बेळगाव नंतर त्यांनी गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली त्यानंतर सातारा अशा एका मागोमाग एक आवृत्ती सुरू केल्या आणि अत्यंत लिबरल अशा पद्धतीचे हे वृत्तपत्र कोणाचाही मुलाहिजा न राखता सुरु ठेवले. त्याचबरोबर कोणावरही अन्याय होऊ नये उलटपक्षी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवणे, प्रसंगी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे परंतु सत्याची कास सोडायची नाही, हा निर्णय आणि निर्धार करून मामांनी हे वृत्तपत्र ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी लोकप्रिय केले. जे इतर वृत्तपत्रांना शक्य झाले नाही. अशा अनेक सकारात्मक गोष्टी त्यांनी सुरू केल्या. वृत्तपत्र विक्रेत्यांकडे क्वचितच कोणीतरी संपादक पोहोचायचे परंतु आपण मालक आहे हे ध्यानात न ठेवता वृत्तपत्र विक्रेता हा माझा एक कुटुंब सदस्य आहे अशा भावनेने त्यांनी त्या विक्रेत्यांनादेखील आपलेसे केले. वाचकांशी जवळीक साधली. जास्तीत जास्त व्यक्तींचे फोटो प्रसिद्ध करून प्रत्येकाच्या कार्यकुशलतेला सलाम करत त्यांना प्रसिद्धीमध्ये आणले आणि त्यांचे तमाम जनतेशी नाते जोडून दिले. एक अफाट असे कार्य डॉ. किरण ठाकुर यांनी हाती घेतले. ‘दैनिक तरुण भारत’ हे यशोशिखरावर विराजमान झाले. या वृत्तपत्र माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या हजारो जणांना रोजगार संधी प्राप्त करून दिली. आपण स्वत: प्रसिद्धीच्या मागे न जाता डॉ. किरण ठाकुर यांनी वृत्तपत्र चालविणे हे सामाजिक बंधन या नात्याने समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादमधून मामांनी महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे जन आंदोलने उभारली. सरकारला सळो की पळो करून सोडले, बेळगावातील मराठी बांधवांवर कर्नाटकद्वारे होणारे अन्याय आणि अत्याचार मामांना सहन होत नव्हते. तमाम जनतेला एका झेंड्याखाली आणून प्रसंगी वाटेल तो त्याग करण्याची तयारी ठेवली आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीही केली. कर्नाटक सरकारने मामांना प्रत्येकवेळी त्रास दिला. बेळगावला छावणीचे स्वरूप निर्माण केले. मराठी बांधवांवर लाठी हल्ले झाले. घरादारांवर दगडफेक झाली. कर्नाटक पोलिसांनी घरात घुसून मराठी बांधवांना त्यांच्या आई बहिणींना देखील मार दिला, येथे छळ केला, त्यांच्यावर बंदुकांच्या गोळ्या झाडल्या, अनेक माणसे त्यात मरण पावली, हुतात्मा झाली परंतु मराठी बांधवांनी आपल्या तत्त्वाच्याबाबतीत कधीच तडजोड केली नाही. डॉ. किरण ठाकुर हा सीमा बांधवांचा बुलंद आवाज ठरला. दुर्दैवाने महाराष्ट्राने या आंदोलनाची गंभीरपणे दखल घेतली नाही परंतु मामांनी आपला लढा कधी मागे घेतला नाही. आजही अन्यायाविरोधात ते लढत आहेत आणि इतरांनादेखील प्रेरणा देत आहेत. डॉ. किरण ठाकुर यांचे जीवन समाजकल्याणासाठी समर्पित आहे. सीमाप्रश्नाच्या आंदोलनात डॉ. किरण ठाकुर म्हणजे भास्कर आहेत. त्याच्या तळपण्याने आंदोलनातील तीव्रता वाढली. त्यांच्या तेजोमयी किरणांनी अनेकांना स्फुरण आले, चैतन्य निर्माण झाले आणि त्याग भावनेने मामांच्या खांद्याला खांदा लावून अन्यायाविरोधात लढत राहिले. आजही त्यांचा हा लढा चालूच आहे. ‘भगवान के घर देर है अंधेर नही है!’ या उक्तीवर मामांचा दृढविश्वास आहे. काम करीत रहा वाटेत संकटे बरीच असतील परंतु संकटांना सामोरे जा त्यातून आपण बाहेर पडू. पण अनुभवाची शिदोरी सातत्याने तुमच्या पाठीशी राहणार आहे हा विचार ते सदोदित मांडत असतात.

वृत्तपत्र चालविताना त्याच्या पाठीमागे कोणीही मदतीला नसतो. केवळ जाहिरातीच्या माध्यमातून वृत्तपत्रे चालतात मात्र त्यातून रोजगार, सामाजिक भान वगैरे लक्षात घेता त्यातून नफा मर्यादित असतो. मामांच्या समोर अनेकजण मदतीसाठी येत असतात आणि कोणालाही नाही म्हणणे हे त्यांच्या स्वभावात नाही. त्यामुळे एका बाजूने सामाजिक, दुसऱ्या बाजूने आर्थिक उन्नती हे लक्षात घेऊन त्यांनी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली. गंमत अशी की अनेकांनी अशा पद्धतीच्या सोसायटी स्थापन केल्या. परंतु या आर्थिक सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पद्धतीने रोजगार संधी उद्योग व्यवसायाला पतपुरवठा आणि या संस्थेमध्ये जे कोणी पैसे डिपॉझिट ठेवतील त्यांना जास्तीत जास्त व्याजदर मिळावेत, हे उद्दिष्ट समोर ठेवले. डॉ. किरण ठाकुर या संस्थेचे चेअरमन झाले आणि जनतेला त्या संस्थेबद्दलची आस्था निर्माण झाली. जिथे डॉ. किरण ठाकुर आहेत तिथे विश्वास आहे आणि या विश्वासाला ते कधीही तडा देणार नाहीत, याची तमाम जनतेला कल्पना आहे. म्हणूनच या सोसायटीने अल्पावधीतच गगनभरारी घेतली. डॉ. किरण ठाकुर हे या सोसायटीचे ब्रँड अँबेसिडर आहेत. ही संस्था चालवताना त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून अनेक सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम, संशोधनात्मक कार्य, महिलांना रोजगार, अनेक नवे उद्योजक निर्माण करणे, हे करीत असतानादेखील मामांनी ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा भ्रमाचा भोपळा फोडला आणि संस्था अधिक मजबूत केली. मामांचा जन्मच मुळी सामाजिक कार्यासाठी झालेला आहे, हे त्यांच्या एकंदरीत आजवरच्या कार्यातून स्पष्ट होते. आज ते बेळगावमध्ये खानापूर या भागात देखील अनेक शाळा महाविद्यालय चालवतात. एवढेच नव्हे तर आरपीडी कॉलेजसाठी त्यांचे मार्गदर्शन मिळते आहे. शिक्षणाची कवाडे त्यांनी बेळगावात खुली केली आणि ज्ञानाची किरणे सर्वत्र पसरली. जास्तीत जास्त मुले शिकली पाहिजेत तथा केवळ शिकून शिक्षित झाली पाहिजेत असं नाही तर ती सुसंस्कृत झाली पाहिजेत, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी ही वित्तीय क्षेत्रातील देशातील फार मोठी अग्रगण्य अशी संस्था चालविणे सोपे नाही. आज त्याच्या 250 शाखा झाल्या आहेत, हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. अशा संस्था चालविताना ते अत्यंत शांतपणे सारेकाही हाताळत असतात. मामांचे आतापर्यंतचे एकंदरीत कार्य पाहता, मामा स्वत:च एक चळवळ आहेत, मामा स्वत: एक संस्था आहे, मामा अनेकांचे आधारस्तंभ आहेत, मामा अनेकांची प्रेरणा आहेत. मामा म्हणजे एक चालतेबोलते विद्यापीठ आहे आणि सर्वसामान्य माणसांसाठी ते औषधी झाड आहे. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचा इतिहास म्हणजे सर्वांसाठीच आश्चर्यजनक असा प्रवास आहे. ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गगनावरी’ हा वेलू गगनावर पोचविण्यामध्ये मामांचा वाटा सिंहाचा आहे. या सोसायटीचा हा अल्पावधीतील यशस्वी प्रवास अनेक अडथळे पार करून गेलेला आहे. जीवनात यशस्वी होणार तर अनेक अडथळे समोर येतात ते पार पाडताना तुमची कसोटी असते. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!’ याप्रमाणे युद्धाच्या प्रसंगांना मामा नेहमी धीटाने आणि आत्मविश्वासाने तोंड देत राहिले. सहजपणे मिळालेले यश हे टिकत नसते परंतु संघर्ष, संकटातून आणि अनेक अडथळे पार करून जो यश संपादन करतो त्याचे यश हे चिरकाल टिकणारे असते. ‘सब्र का फल मिठा होता है!’ यावर त्यांचा विश्वास असल्याने कष्टाशिवाय फळ नाही या उद्देशाने मामांनी कष्टाने यश प्राप्त केले आहे.

Advertisement

किरण ठाकुर यांचा एकंदरीत हा प्रवास प्रेरणादायी आहे. नवोदितांसाठी त्यांचे जीवनकार्य तेजोमयी आहे. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटणारे असे हे व्यक्तिमत्व काही वेळा अशा पद्धतीची व्यक्तिमत्वे म्हणजे चंदनाने स्वत: झिजून दुसऱ्याला सुगंध देण्यासारखा प्रकार आहे. त्यांचा शालेय प्रवास बाजूला ठेवला तर गेली साठ वर्षे हे व्यक्तिमत्व इतरांसाठी काम करीत राहिले. मामा म्हणजे कोटि कोटि किरण तुझे अनलशरा उधळिती अमृतकण परि होऊन अणुरेणू उजळिती ! असेच आहे. किरणे उष्ण असतात, तरी तेच किरण अणुरेणूमध्ये पसरून अमृता सारखे जीवनदायी ठरतात. मामांच्या कार्याला मानाचा मुजरा.

सागर जावडेकर

Advertisement
Tags :

.