For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुण्यात शिवशाहीमध्ये तरुणीवर अत्याचार

06:44 AM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
पुण्यात शिवशाहीमध्ये तरुणीवर अत्याचार
Advertisement

बोपदेव घाटानंतरच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Advertisement

►  पुणे / मुंबई : प्रतिनिधी

 पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे घडली. बोपदेव घाटातील अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेटसारख्या गजबजलेल्या परिसरातील मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्याहून पहाटेच्या सुमारास फलटणला निघालेल्या या तऊणीची दिशाभूल करून नियोजनपूर्वक आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा कैद झाला असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Advertisement

दत्तात्रय रामदास गाडे (वय 35, रा. शिक्रापूर, पुणे ) असे या नराधमाचे नाव असून, तो सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी ही फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट स्थानकात आली होती. त्यावेळी गाडे याने फलटणच्या बस येथे लागत नसून, समोर लागत असल्याचे सांगितले. त्यावर तरुणीने मी येथेच थांबते, असे सांगितले. मात्र, आगारात मधोमध उभी असलेली शिवशाही बस फलटणला जाणार असल्याचे गाडे याने सांगितले. या वेळी त्याने ताई, ताई असा उल्लेख करीत या तऊणीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही तरुणी विश्वास ठेवून दरवाजा उघडून बसमधे बसली. पाठोपाठ गाडेही बसमध्ये आला. त्यानंतर गाडेने बसमध्येच या तऊणीवर अत्याचार केला. या घटनेची वाच्यता कुठेही केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने या तरुणीला दिली. या घटनेनंतर पीडित तऊणी प्रचंड घाबरली. त्यामुळे तिने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. यानंतर तिने मनाचा धीर करत फलटणला जाणारी दुसरी बस पकडली. वाटेत तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार मित्राला सांगितला. त्यानंतर तरुणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली.

 सीसीटीव्हीत आरोपीची ओळख पटली

या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी स्वारगेट परिसरातील सर्व सीसीटीव्हींची कसून तपासणी केली. त्यात सीसीटीव्हीमध्ये गाडे याचा चेहरा कैद झाल्याचे समोर आले. आरोपी गाडे याने यापूर्वीदेखील गुन्हे केले असून, त्याच्यावर साखळी चोरीसारखे काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, फरार गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 8 पथके तयार करण्यात आली आहेत. दुसरीकडे या खळबळजनक घटनेमुळे पुण्यासह सबंध राज्य हादरले असून, विरोधकांनीही या मुद्द्यावर रान उठवल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयही अॅक्शन मोडवर आले आहे.

 पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

पुण्यातील कोयता गँगचा राडा, गँगवॉर, खूनाच्या घटना, बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरण, तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरण प्रकरणात दाखविण्यात आलेली चपळाई यामुळे पोलिसांवर चौफेर टीका होत असताना शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणाने पुणे पोलिसांच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले आहेत.

महिला आयोगाकडून गंभीर दखल

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ऊपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या, की या अनुषंगाने मी पोलीस आयुक्त आणि तपास अधिकाऱ्यांशी बोलले आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजही मी पाहिले आहे. या तऊणीशी आरोपी काही वेळ बोलत होता. त्याने खेटे सांगून व दिशाभूल करून तऊणीला बसमध्ये नेले व अत्याचार केला, असे समोर आले आहे. अनोळखी व्यक्तीशी बोलताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दुर्दैवाने पाडित मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला व पुढचा वेदनादायी प्रसंग घडला. या सगळ्या घटनेचा पोलीस तपास करीत असून, आरोपीला लवकरच अटक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

स्वारगेट बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करा असे स्पष्ट आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सात दिवसात सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) विवेक भिमानवार यांना दिल्या. तसेच राज्यातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यासाठी आज गुऊवारी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलाविण्यात आली आहे.

आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही : अजित पवार

स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे झालेली घटना पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीला अटक झाली असून त्याला कठोर शासन होईल असे आश्वासन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.   पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही असे म्हणत अजितदादांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

सखोल तपासाचे आदेश : मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात प्रतिक्रिया देताना सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस आयुक्तांबरोबर संपर्क साधला. त्यांना सखोल तपासाचे आदेश दिले. आरोपीची ओळख पटल्यावर पोलिसांनी तातडीने तपास करून त्याच्या घरापर्यंत माग काढला, त्याच्या भावाला ताब्यात घेत त्याची माहिती मिळवली व त्यालाही अटक केली. आता त्याला कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिस काळजी घेतील असे ते म्हणाले.

  पोलिसांनी अधिक जागरुक राहायला हवे : मंत्री चंद्रकात पाटील

चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमांवर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुण्यात अनेकांची विविध कारणांनी येजा असते. त्यामुले सगळीच बसस्थानके सतत गजबजलेली असतात. पोलिसांनी अशा वेळी अधिक जागरूक राहून विशिष्ट वेळांमध्ये सर्तक रहायला हवे. तसे पोलिसांना सांगण्यात येईल असे पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.