खेडमधील तरुणीची 4 लाखांची फसवणूक
खेड :
‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली घरबसल्या पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणीची तब्बल 4 लाखाची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही तरुणी यापूर्वी पुणे येथे नोकरीस होती. त्यानंतर ती येथे आली होती. एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधत ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे घरबसल्या जास्तीत-जास्त रक्कम कशी मिळवता येईल, या बाबतची माहिती देत पीडीएफ फाईलही पाठवली. तरुणीचा विश्वास संपादन करत सुरुवातीला काही रक्कम गुंतवण्यास सांगितले. ही रक्कम गुंतवल्यानंतर त्या बदल्यात तरुणीला परतावाही दिला. 3 ते 4 वेळा रक्कम खात्यात जमा झाल्याने तरुणीचा विश्वास आणखी वाढला. त्या भामट्याने आणखी रक्कम गुंतवण्यास सांगून पुन्हा जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत भामट्याच्या खात्यात वेळोवेळी रक्कम गुंतवली. गुंतवलेल्या रकमेवर परतावा मिळण्याचे बंद झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या तरुणीची 4 लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला. पोलीस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार नोंदवली. त्यानुसार भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.