रंगपंचमीला गेलेली युवती बुडाली
कराड :
बारावीची परीक्षा संपल्याने रंगपंचमीचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी महाविद्यालयीन युवक-युवतींचा ग्रुप टेंभू उपसा प्रकल्पाच्या परिसरात गेला होता. कराडजवळ असलेल्या टेंभू प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 ‘ब’ च्या डोंगराच्या पायथा परिसरात निर्जनस्थळी रंगपंचमी साजरी करून हे युवक-युवती फोटोसेशन करत होते. रंग खेळून झाल्यावर हातपाय धुण्यासाठी गेल्यावर पाय घसरून एका युवतीसह युवक असे चौघेजण वेगाने वाहणाऱ्या बोगद्याजवळील पाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात आल्यावर एका मैत्रिणीच्या प्रसंगावधानाने तिघे युवक कसेबसे वाचले पण युवती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तिचा मृतदेह सुमारे दोन कि. मी. अंतरावर चार तासांनी आढळला. जुईली अजित घोरपडे (वय 17, रा. कार्वेनाका, कराड) असे त्या दुदैवी मुलीचे नाव आहे.
- परीक्षेनंतरचा आनंद शेवटचा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुईली घोरपडे ही बारावी वाणिज्य शाखेत होती. तिची बोर्डाची परीक्षा नुकतीच संपली. परीक्षा संपल्याने तिच्यासह क्लासमधील मित्र व मैत्रिणींनी रंगपंचमी साजरी करण्यासाठी टेंभू प्रकल्पाकडे जाण्याचा निर्णय घेतला. जुईलीसह अन्य काही मित्र व मैत्रिणी असे सात जण बुधवारी सकाळी टेंभू परिसरातील डोंगरावर टप्पा क्रमांक 1 ब परिसरात सकाळी साडेअकरा वाजता पोहोचले. रंगपंचमी खेळतानाचे फोटो, व्हिडीओ काढण्यात ते गुंग होते. खूप वेळ ते सर्वजण आनंदात होते.
- रंगाचा बेरंग अन् अश्रूंच्या धारा
रंग खेळून झाल्यानंतर जुईली हिच्यासह तिघेजण टेंभू प्रकल्पाच्या पाण्यात हात पाय धुण्यासाठी गेले. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगात होता. या प्रवाहाचा अंदाज न आल्याने जुईलीचा पाय घसरून ती पाण्यात गेली असावी. यानंतर अन्य तिघेही पाण्यात पडले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. या चौघांनी वेगवान पाण्यात पोहण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य नव्हते. अखेर हा प्रकार काठावर असलेल्या एका युवतीच्या लक्षात आल्यावर तिने पाण्यात पडलेल्या एका युवकाला इतर मित्रांच्या मदतीने बाहेर काढले. एकापाठोपाठ तिघेजण अक्षरश: मृत्युच्या दाढेतून बाहेर निघाले. जुईली हिला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला.
- ‘ती’ बुडाल्याने यांचा थरकाप उडाला
टेंभू प्रकल्पात पडलेल्या चौघांना वाचवण्यासाठी एका मुलीची भूमिका महत्त्वाची ठरली. तिच्या मदतीने अन्य दोघांनी तिघांना बाहेर काढल्यानंतर ते जुईली हिला बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू लागले. मात्र पाण्याच्या वेगात जुईली प्रकल्पाच्या पाण्याच्या भोवऱ्यात दिसेनाशी झाली. जुईली दिसेनाशी झाल्यावर या सहाजणांच्या अंगाचा अक्षरश: थरकाप उडाला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी हा प्रकार नातेवाईकांना कळवला. नातेवाईकांनी पोलिसांना कळवले.
- सहा तासांनी मृतदेह आढळला
अत्यंत निर्जनस्थळी घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक होता. सातही जणांच्या पालकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी चौधरी, पोलीस पाटील मुलाणी यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तात्काळ शोध मोहीम राबवण्यासाठी पोहण्यात तरबेज असलेल्यांना प्रचंड पाण्याच्या वेगात जुईलीच्या शोधासाठी पाठवले. दिवसभर ही शोधमोहीम सुरू होती. अखेर अथक प्रयत्नानंतर दोन कि. मी. अंतरावर डोंगराच्या पलीकडे शामगाव हद्दीत जुईलीचा मृतदेह आढळून आला. तो शवविच्छेदनासाठी कराडच्या वेणूताई चव्हाण रूग्णालयात पाठवून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
- तिकडे नातेवाईक सुन्न तर इकडे मैत्रिणींचा हंबरडा
रंगपंचमीच्या दिवशी कराडच्या प्रतिष्ठित कुटुंबातील युवक युवतींच्या मैत्रिणीचा झालेला मृत्यू हा तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का देणारा आहे. एका बाजूला घोरपडे कुटुंब सुन्न झाले होते तर दुसरीकडे हा प्रकार घडताना पाहिलेल्या तिच्या मित्र व मैत्रिणींच्या अंगाचा थरकाप उडाला होता. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे प्रकार कसा घडला, याची माहिती पोलीस घेत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते.
- टेंभू टप्पा क्र. 1 ब मध्ये दुर्घटना
टेंभू प्रकल्पातील पाणी पंपाच्या सहाय्याने उचलून टेंभूपासून सुमारे तीन किमी दूर असलेल्या डोंगराच्या पायथ्याला तलावात सोडण्यात आले आहे. या तलावातून पुन्हा पंपाच्या सहाय्याने पाणी उचलून अर्ध्या डोंगराच्या मध्ये असलेल्या टनेलमध्ये सोडण्यात आले आहे. डोंगर पायथ्याचा तलाव ते टनेल याला टप्पा क्र. 1 ब असे म्हणतात. अवाढव्य पाईपमधून टनेलमध्ये पाणी पडते. त्यामुळे पाण्याला प्रचंड वेग असतो. या टनेलमधून सायफन पद्धतेने पाणी डोंगराच्या पलिकडे खंबाळे हद्दीत पोहोचते. याच टनेलमध्ये जुईली घोरपडे पडल्याने तिला वाचववण्याची संधी मिळाली नाही.