Kolhapur : कोल्हापुरात प्रसूतीनंतर तरुण आईचा मृत्यू; तीन दिवसांचे बाळ पोरके
पंचगंगा हॉस्पिटलमध्ये चक्कर आल्याने मातृत्व हरपले
कोल्हापूर : प्रसुतीनंतर दवाखान्यात उपचार सुरु असताना चक्कर आल्याने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तीन दिवसांचे बाळ आईच्या मायेला कायमचे पोरके झाले. शिवानी निखील जाधव (वय २५ रा. मोहिते कॉलनी, तपोवन) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रंकाळा टॉवर परिसरात राहणाऱ्या शिवानी (वय २५) यांचे दोन वर्षांपूर्वी मोहिते कॉलनी येथील सराफ व्यावसायिक निखिल जाधव यांच्याशी लग्न झाले होते. पती आणि सासू सासऱ्यांसोबत त्या राहत होत्या. सोमवारी (दि. १७) दुपारी त्यांना प्रसववेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने पंचगंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सोमवारी सायंकाळी सिझर करण्यात आले. यावेळी त्यांनी एका गोंडस चिमुकल्यास जन्म दिला. पाच दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र पंचगंगा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. २०) पहाटे पाचच्या सुमारास बेड बदलताना शिवानी यांना चक्कर आली आणि काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्यांना सीपीआरमध्ये हलवले. सीपीआरमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
या घटनेने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
तीन दिवसाचे बाळ आईच्या मायेस पोरके
मोहिते कॉलने येथील जाधव कुटूंबात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. जाधव कुटुंबियांकडून बाळाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होती. चिमुकल्या बाळाची आई प्रसुतीनंतर अवघ्या तिसया दिवशी मृत झाली. या घटनेने नवजात चिमुकला आईच्या मायेला पोरका झाला.